आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरबीआयने निर्बंध वाढवले:नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या अडचणीत वाढ; ठेवीदार, खातेदारांच्या पदरी निराशा कायम

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात शाखा असलेल्या नगर अर्बन मल्टीस्टेट-शेड्युल्ड बँकेच्या कारभारावर भारतीय रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी घातलेले निर्बंध आता आणखी तीन महिने वाढवले आहेत. आता येत्या 6 सप्टेंबरपर्यंत रिझर्व्ह बँकेचे निर्बंध या बँकेवर कायम राहणार आहेत. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने निर्बंध वाढवताना कोणत्याही सवलती न दिल्याने ठेवीदार व खातेदारांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे.

सव्वा दोन वर्षांच्या प्रशासकीय कारकीर्दीनंतर मागील वर्षी नोव्हेंबर 2021 मध्ये नगर अर्बन बँकेची निवडणूक झाली. सत्ताधार्‍यांनी 1 डिसेंबरला सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या सहा दिवसातच रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेच्या कामकाजावर 6 डिसेंबर 2021पासून निर्बंध जारी केले. ठेवीदार व खातेदारांना एकदाच 10 हजारापर्यंत रक्कम काढता येणार, नव्या ठेवी स्वीकारता येणार नाही, नवे-जुने कर्ज प्रकरण करता येणार नाही, नवे कर्ज वाटप करता येणार नाही, बचत व चालू खात्यावरील व्यवहार करता येणार नाही, असे हे निर्बंध आहेत. हे निर्बंध येत्या तीन महिन्यांसाठी कायम ठेवले आहे.

संचालकांनी राजीनामे द्यावेत : गांधी

रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेवरील निर्बंध आणखी तीन महिन्यांसाठी वाढवल्याने याबाबत नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी, विद्यमान संचालक मंडळाने तातडीने राजीनामा देण्याची मागणी केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या नव्या आदेशात ठेवीदार व खातेदारांसाठी कोणतीही सवलत नाही व आहे तेच निर्बंध कायम ठेवले गेल्याने हे संचालक मंडळाचे अपयश आहे. गेल्या सहा महिन्यात या संचालकांनी बँकेची प्रगती होण्यासाठी व थकबाकी वसुलीसाठी काहीच प्रयत्न केले नाही. त्यामुळे या सर्व अपयशाची जबाबदारी घेवून आणि ठेवीदार व खातेदारांना होत असलेल्या त्रासाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व संचालकांनी राजीनामा दिला पाहिजे व बँक पुन्हा प्रशासकांच्या ताब्यात देण्याची विनंती रिझर्व बँकेला केली पाहिजे. प्रशासक होते तोपर्यंत बँकेचे सर्व बँकींग व्यवहार सुरू होते. सोने तारण कर्ज व्यवसाय सुरू होता व सर्वात महत्त्वाचे ठेवीदारांना ठेवी परत मिळत होत्या, असेही गांधी यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...