आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किसान सभा आक्रमक:केंद्र सरकारने ऊस 'एफआरपी'मध्ये केलेली वाढ फसवी; डॉ. अजित नवले यांचा आरोप

अहमदनगर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने ऊस 'एफआरपी'मध्ये केलेली वाढ फसवी आहे, अशी टीका अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी गुरुवारी (4 ऑगस्ट) केली.

काय म्हणाले नवले?

ऊस 'एफआरपी'मध्ये केंद्र सरकारने 150 रुपयांची वाढ केली. 2022-23 च्या गळीत हंगामासाठी प्रतिटन 'एफआरपी' 3050 रुपये केंद्र सरकारने जाहीर केले. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखान्यातील 5 लाख कामगार व ऊस तोडणी कामगारांना मोठा लाभ होणार असल्याचे मोदी सरकारने सांगतले. मात्र एफआरपीचा रिकव्हरी बेस मागील वर्षाच्या तुलनेत 10 टक्के वरून 10.25 टक्के करण्यात आला.

केंद्र सरकारच्या धोरणांचा परिणाम म्हणून इंधन, खते, औषधे, मजुरी, वाहतूक व बियाणे या सर्व बाबींमध्ये मोठी भाववाढ झाली आहे. परिणामी उसाचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत एफआरपीमध्ये 150 रुपये केलेली वाढ अत्यंत तुटपुंजी आहे. त्यातही बेसमध्ये फेरफार केल्यामुळे या वाढीमध्ये एका हाताने देऊन, दुसर्‍या हाताने काढून घेण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत रिकव्हरी बेस 9.50 वरून हेतुतः 10.25 पर्यंत वाढवण्यात आला आहे.

अनेक कारखान्यांनी टाळले एफआरपी

एफआरपीमध्ये वाढ करत असताना त्यानुसार दर देता यावा यासाठी साखरेच्या किमान विक्री दरात त्यानुसार वाढ करण्याची आवश्यकता असते. केंद्र सरकारने साखर विक्री किमान दरात वाढ न केल्याने कारखान्यांना एफआरपी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यावे लागत आहे. अनेक कारखाने यामुळे एफआरपी देण्याचे टाळत आहेत. राज्यातील सहकारी चळवळ यामुळे संकटात आली आहे. यंदाच्या हंगामातही साखर किमान विक्री दरात वाढ करण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांना एफआरपी मिळणे अवघड बनले आहे, असेही नवले म्हणाले.

सर्वसामान्य मतदार व शहरी मध्यमवर्गाला, आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत, असे भासवण्यासाठी एकीकडे एफआरपीमध्ये वाढ केल्याची घोषणा करायची व दुसरीकडे रिकव्हरी बेस वाढवून ही वाढ शेतकऱ्यांना मिळणार नाही याची तरतूद करायची हा भाजप प्रणित केंद्र सरकारचा कावा अत्यंत निंदनीय व शेतकरीविरोधी आहे. अखिल भारतीय किसान सभा केंद्र सरकारच्या या कावेबाज कृतीचा तीव्र धिक्कार करत आहे, असेही किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...