आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातक्रारदार महिलेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून एकेरी शब्दात विचारणा करणाऱ्या संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील ठाणे अमलदार व महिला पोलिस कर्मचाऱ्याकडून उद्धट वागणूक मिळाल्याने या महिलेने पोलिस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे ही महिला एका दिवंगत पोलिस अधिकाऱ्याची पत्नी आहे.
मंगळवारी रात्री ८ वाजता सदर महिला तक्रार देण्यासाठी शहर पोलिस ठाण्यात आल्या होत्या. मात्र, पोलीस ठाण्यात अतिशय उत्तम बसण्याची व्यवस्था असतांनाही पोलिसांनी बराच वेळ त्यांना बाहेर ताटकळत ठेवत एकेरी शब्दात बोलून उद्धट वर्तन केले. अशा वेळी या महिलेला न्याय मिळविण्यासाठी पोलिसांकडे उगाचच आलो, अशी भावना निर्माण झाली. येथे उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते मुक्तार शेख, किरण गांधी, गणेश रासने यांनी या महिलेला मदतीचा हात दिला.या महिला बाहेरील जिल्ह्यातील असून आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी संगमनेर येथे राहत आहेत. जिल्हा पोलिस अधिक्षकांनी या घटनेची चौकशी करावी, अशी मागणी या महिलेकडून करण्यात येणार आहे.
संगमनेर शहर पोलिस ठाण्याला प्रभारी पोलिस निरीक्षकाची नियुक्ती असल्याने पोलिसांवर वचक नाही. खून, दरोडे यासारख्या गुन्ह्यांचा तपास लावण्यातही शहर पोलिसांना अपयश येत आहे. शहर व तालुक्यातही चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. वाहतूक व्यवस्थेवर पोलिसांचे नियंत्रण नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबत तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी जनतेतून होत आहे. शहर पोलिस ठाणे सातत्याने वेगवेगळ्या घटनांमुळे वादग्रस्त ठरत आहे. अनेक गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जाते. अनेकदा गुन्हा दाखल न करण्याची भूमिका घेतली जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.