आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नगर ते थेट पुण्यापर्यंत भारतातील पहिलाच 100 किमीचा 3 मजली उड्डाणपूल; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे दिल्लीत भाजपच्या शिष्टमंडळाला आश्वासन

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 7,200 कोटींचा खर्च, औरंगाबादकरांबरोबरच नगरकरांचाही वेळ वाचणार

नगरकरांबरोबरच औरंगाबादकरांचाही पुणे प्रवासाचा वेळ वाचणार आहे. अहमदनगरमधून थेट पुण्यापर्यंत १०० किमीचा ३ मजली उड्डाणपूल तयार होणार असून त्याच्या आराखड्याला मंजुरीही मिळाली आहे. अशा प्रकारचा हा भारतातील पहिलाच तीनमजली पूल असणार आहे. त्यासाठी प्राथमिक सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत खासगी संस्थेला देण्यात येणार आहे.

अहवालानंतर निविदा प्रक्रियेला वेग येईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीत भाजपच्या शिष्टमंडळातील नगरचे माजी पालकमंत्री राम शिंदे, भाजपचे माजी गटनेते सुवेंद्र गांधी यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दिले. औरंगाबाद-नगर-पुणे हा चौपदरी रस्ता नेहमीच वर्दळीचा राहतो. नगर शहर, शिरूर-वाघोली या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होते. ती कमी करण्यासाठी नगर बाह्यवळण रस्ता ते चंदननगर हा १०० किमीचा तीन मजली उड्डाणपूल तयार होणार आहे. त्यावर ७,२०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

नगरच्या बायपासपासून ते चंदननगरपर्यंत पूल

अहमदनगर शहराबाहेरील बाह्यवळण रस्त्यापासून या तीनमजली उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. नगर बाह्यवळण रस्ता ते वाघोलीमार्गे चंदननगरपर्यंत आहे. त्याच रस्त्यावर ७,२०० कोटी रुपये खर्च करून केंद्र सरकार हा पूल उभारणार आहे.

औरंगाबादकरांची ३० मिनिटे वाचणार
नगर शहरातील उड्डाणपुलाचे ५५% काम झाले आहे. मे २०२२ पर्यंत तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. औरंगाबादहून पुण्याकडे जाणाऱ्यांचा नगर शहरातील कोठला, चांदणी चौक, स्वस्तिक चौक या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे बराच कालावधी जायचा. नव्या उड्डाणपुलामुळे औरंगाबादकरांची ३० मिनिटे वाचणार आहेत.

प्राथमिक अहवालानंतर नकाशे तयार केले जाणार
खासगी संस्थेकडून या प्रस्तावित तीनमजली उड्डाणपुलाचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर त्याच्यावर अभ्यास करून केंद्र सरकार नकाशे तयार करणार आहे. यानंतर निविदा प्रक्रिया राबवली जाईल. २०२२ अखेरपर्यंत ती पूर्ण होऊन कामाला सुरुवात होईल, असा अंदाज आहे.

वाहतूक कोंडी कमी होईल
या उड्डाणपुलासाठी सविस्तर प्राथमिक अहवाल मागून घेणार तसेच उड्डाणपुलाची निविदा लवकरच काढणार असल्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिले. यामुळे नगर-पुणे रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल. गडकरी भूमिपूजनासाठी येणार आहेत. - राम शिंदे, माजी मंत्री.

रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग
औरंगाबाद-नगर-पुणे रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे. लवकरच तो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग होईल. जिल्ह्यात या मार्गावर २ टोलनाके आहेत. नेवासे तालुक्यातील वडाळा येथील टोलनाक्याची मुदत संपली आहे. सा.बां. विभागाने तसे पत्र विकासकाला दिले. सध्या सुपा येथील टोलनाका सुरू आहे. त्याची मुदत संपल्यानंतर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...