आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त वक्तव्य प्रकरण:इंदोरीकर महाराजांना मोठा दिलासा; कोर्टात हजर राहण्याच्या आदेशाला तुर्तास स्थगिती

संगमनेरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांवर पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता

वादग्रस्त विधानाबद्दल निवृत्तीमहाराज देशमुख यांनी न्यायालयात हजर राहावे, या आदेशाला येथील वरिष्ठ जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे महाराजांना तूर्त दिलासा मिळाला. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश आधी देण्यात आले होते.

पुत्रप्राप्तीसंदर्भात वादग्रस्त विधान केल्याने निवृत्ती महाराज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी स्थानिक वैद्यकीय अधिकारी डॉ. भास्कर भवर यांना तक्रार दाखल करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार संगमनेरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली. न्यायाधीश पी. डी. कोळेकर यांनी इंदोरीकर महाराजांना ७ ऑगस्टला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. या संदर्भात आश्वी पोलिसांनी १५ जुलैला समन्सही बजावले होते. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयात निवृत्ती महाराजांच्या वतीने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी केलेल्या आदेशावर दोन याचिका दाखल करण्यात आल्या. त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली. २० ऑगस्टला येथील जिल्हा सत्र न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे. यावेळी सरकारी पक्षाला बाजू मांडावी लागणार आहे. सध्यातरी इंदोरीकर महाराजांना न्यायालयात हजर राहण्याची व या संदर्भात जामीन देण्याचीही आवश्यक्ता नाही, असे त्यांच्या वतीने बाजू मांडणारे अ‍ॅड. के. डी. धुमाळ यांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलतांना सांगितले. इंदोरीकर महाराज शुक्रवारी न्यायालयात हजर होतील, अशी अपेक्षा होती. त्यामुळे न्यायालयाच्या आवारात नागरिकांनी गर्दी केली होती.

काय म्हणाले होते इंदोरीकर महाराज?

“स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते” असे वादग्रस्त वक्तव्य इंदोरीकर महाराज यांनी केले होते. लिंग भेदभाव करणाऱ्या या वक्तव्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितलं होतं. यावर दिलेल्या कालावधीच्या अखेरच्या दिवशी इंदोरीकरांनी आपल्या वकिलामार्फत उत्तर देत खुलासा केला होता.

इंदोरीकर महाराज यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. काही सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली होती.

बातम्या आणखी आहेत...