आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदुंवरील अन्याय व धर्मांतर खपवून घेणार नाही:आमदार नितेश राणे यांचा श्रीरामपुरातील जनआक्रोश मोर्च्यामध्ये इशारा

अहमदनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे मंत्री आता नवाब मलिक आणि जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाही, तर राज्याचे मुख्यमंत्री कडवे हिंदुत्ववादी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, हे पोलिसांनी लक्षात ठेवावे. त्यामुळे हिंदूंवर अन्याय झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी शनिवारी श्रीरामपुरात दिला आहे.

प्रेमप्रकरणातून भोकर येथील दीपक बर्डे याच्या अपहरण होऊन अनेक दिवस उलटूनही पोलिसांना त्याला शोधण्यात अपयश आले आहे. श्रीरामपुरात अल्पवयीन मुलींवर होत असलेल्या अत्याचार व धर्मांतराच्या वाढत्या घटनांना आळा बसवावा, यासाठी आमदार नितेश राणे व माजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे नेतृत्वाखाली शनिवारी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार राणे यांनी पोलिस यंत्रणेवर आगपाखड करीत वरिष्ठ पोलिस अधिकारी स्थानिक पोलिस निरीक्षकांना पाठीशी घालून आजाराचे कारण देत रजेवर पाठवतात, असा घणाघात केला.

आमच्या समाजाच्या मुलींचे किंवा मुलांचे अपहरण झाले, तर त्याचा पोलिसांना शोध लागत नाही. दुसऱ्या समाजाच्या बाबतीत झाले, तर त्याचा पटकन शोध लागतो. मग पोलिस ठरावीक समाजाला पाठीशी घालतात की काय? असाही आरोप आमदार राणे यांनी केला. पोलिसांची ताकद फार मोठी आहे. पोलिस काय करू शकतात, याची जाणीव आम्हाला आहे. त्यांनी ठरवले, तर दोन तासांत ते कोणताही शोध लावू शकतात. यावेळी अनेक मुलींच्या अपहरणावाबत व अत्याचाराबाबत अनेक संघटनांनी अतिरिक्त पोलिस अधिकारी स्वाती भोर यांना आमदार राणेंच्या उपस्थितीत निवेदन दिले.

दीपकच्या तक्रारीची दखल घेतली नाही

दीपक याने पोलिसांत येऊन आपल्या जिवाला धोका आहे, हे सांगितले होते. मात्र पोलिसांनी त्याची तक्रार घेतली नाही. त्याच्या तक्रारीची वेळीच दखल घेतली असती, तर ही वेळ आली नसती. त्यामुळे सबंधित अधिकाऱ्यांनी आरोपींना मदत केली की काय असा संशय असून त्यांची वरिष्ठ पाळीवरून चौकशी करण्याची मागणी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे करणार असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले.

दीपकचा घातपात झाल्याचा संशय

या प्रकरणाचा तपास योग्यरीतीने व वेगवान पद्धतीने सुरू आहे. यामध्ये सात आरोपी अटक केलेले आहेत. दीपकचा घातपात करून त्याला गोदावरी नदीत फेकले असल्याची कबुली आरोपींनी दिली असून त्या दिशेने गोदावरी नदीच्या दोन्हीही बाजूने कसून शोध घेत असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर व उपअधीक्षक संदीप मिटके यांनी आमदार राणे यांना दिली.

बातम्या आणखी आहेत...