आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवी दर्शन:शिक्षक दाम्पत्याने देवी दर्शनाला प्राधान्यक्रम देण्याऐवजी जपले माणूसपण

विजय पोखरकर | अकोलेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वीरगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक देविदास गिऱ्हे यांनी वज्रेश्वरी देवीच्या सपत्निक दर्शनाला प्राधान्यक्रम देण्याऐवजी माणूसपण जपले. आपल्या कुटुंबातून दोन आठवड्यांपासून दूर गेलेली व घरच्यांकडून शोध घेऊनही न सापडलेली वीरगाव येथील आदिवासी पोकळे कुटुंबातील मूकबधिर वृद्धा सापडून देण्याचे पुण्य गिऱ्हे दाम्पत्याच्या पदरी आली.

वीरगाव येथील जि. प. शाळेतील शिक्षक देविदास गिऱ्हे हे गुरुवारी (१ सप्टेंबर) इगतपुरी तालुक्यातील वज्रेश्वरीला जायला निघाले. इगतपुरीच्या पुढे त्यांची गाडी चालवत निघाले असतानाच त्यांची पत्नी जीजा हीस रस्त्याच्या विरुद्ध दिशेने चालत येणारी एक वृद्धा ओळखीची वाटली. हे त्यांनी पतीला सांगितले. दरम्यान यावरील चर्चेत दोन अडीच मिनिटे गेली. देविदास यांना आठवलं की, वीरगावात क्षेत्रभेटीला गेलो तेव्हा गावातील मूकबधिर वृद्धा बेपत्ता झाल्याची चर्चा नातेवाईक व नागरिकांत होती. हे आठवल्यावर देविदास यांनी यू टर्न घेतला.

गाडीतून उतरून आपल्या मोबाइलवर त्या वृद्धेचा फोटो घेतला व व्हॉट्सऍपवरून गावाकडील नातेवाईकांना पाठवला. व्हॉट्सऍपवरून तो फोटो व्हायरल झाल्यानंतर वृद्धेच्या नातेवाईकांनी देविदास यांना संपर्क साधून क्ळवले, हीच आमची पोकळे आजी आहे. त्यातून नातेवाईकांच्या जीवाची घालमेल सुरू झाली. १५ दिवसांपासून अधिक काळ ते सर्वदूर वृद्धेचा शोध घेऊन हवालदिल झाले होते. पंधरा दिवसांपासून शोधाशोध करूनही निराशाच पदरी पडलेली. नातेवाईकांनी आजी सापडेल म्हणून आशा सोडून दिलेली. त्यात या वृद्धेला बोलता येत नव्हते. यामुळेच शोधकार्यात अडचण येत होती. अशातच व्हॉट्सऍपवर तीचा असा फोटो बघून त्यांच्या आशा एकदमच पल्लवित झाल्या. देविदास यांनी नातेवाईकांना वृत्तान्त सांगितला. म्हातारीचे नातेवाईक वीरगाव येथून इगतपुरीकडे आजीला घेण्यासाठी निघाले.

देविदास यांना वज्रेश्वरीला जायचे म्हणून पहाटेच निघाले होते. सकाळी साडेसात वाजता त्यांना रस्त्यावरून प्रवास करताना अचानक ही वृद्धा दिसली. त्यांनी माणूसपण जपत आपल्या तीर्थयात्रेचा पुढील प्रवास स्थगित केला. जवळील अन्न वृद्धेस दिले. नातेवाईक येईपर्यंत गिऱ्हे तेथे थांबून राहिले. सकाळी ११.३० वाजता वृद्धेचे नातेवाईक गिऱ्हे यंाच्याजवळ पोहोचले.

हरवलेली व सापडण्याची आशा मावळलेली आपली आजी भेटल्याचा आनंद तिच्या मुलांसह नातवांना झाला होता. त्यांनी गिऱ्हे दाम्पत्याला मनापासून धन्यवाद दिले. कुटुंबासमवेत वृद्धेला गाडीत बसवून दिल्यानंतरच गिऱ्हे दाम्पत्य वज्रेश्वरीकडे रवाना झाले.

बातम्या आणखी आहेत...