आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला सक्षमीकरण:स्त्री शिक्षिका साहित्य संमेलनातून सामाजिक परिवर्तन होणे आवश्यक;खासदार सुळे यांचे प्रतिपादन

कर्जत23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षणाला जात, धर्म नसतो. शिक्षणातून समता येते. त्यात गुणवत्ता महत्त्वाची असते. स्त्री शिक्षणाच्या उद्गात्या म्हणून सावित्रीबाई फुले यांचे कार्य अनन्यसाधारण आहे. त्यांच्यामुळेच महिलांना शिक्षणाचा व स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला. त्यांच्या जन्मदिनी कर्जतमध्ये पहिले स्री शिक्षिका साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनातून आत्मचिंतन होऊन महिलांविषयक सामाजिक परिवर्तन होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या अध्यक्षा, तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयात मराठी विभागाने आयोजित केलेल्या पहिल्या स्त्री शिक्षिका साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कन्नड (जि. औरंगाबाद) येथील वैचारिक लेखिका प्रा. डॉ. प्रतीभा अहिरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, संमेलनाचे स्वागताध्यक्ष रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य राजेंद्र फाळके, आमदार रोहित पवार, बारामती येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार, संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पासाहेब धांडे, बाळासाहेब साळुंके, काकासाहेब तापकीर, नगराध्यक्षा उषा राऊत, उपनगराध्यक्षा रोहिणी घुले, मंजूषा गुंड, राजेंद्र गुंड, सुभाषचंद्र तनपुरे, मधुकर राळेभात, प्राचार्य डॉ. संजय नगरकर आदी उपस्थित होते.

मीनाताई जगधने यांनी सावित्रीबाई फुले यांचे कर्तृत्व मांडतानाच मराठी साहित्यातील थोर साहित्यिकांचे योगदान सांगितले. स्वागताध्यक्ष या नात्याने फाळके यांनी संमेलनाच्या आयोजनामागील हेतू सांगितला. रोहित पवार यांनी सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा चालवून स्री विश्व समृद्ध केल्याचे सांगितले.

संमेलनाध्यक्षा डॉ. अहिरे म्हणाल्या, की सावित्रीबाईंनी तत्कालीन व्यवस्थेविरुद्ध जे बंड केले, त्या निव्वळ सुधारणा नाहीत, तर ती एक मोठी शैक्षणिक व सामाजिक क्रांती आहे. त्यांचा विचार व कार्याचा वसा नि वारसा घेऊन शिक्षणाचे पवित्र कार्य आजच्या शिक्षकांनी करावे. स्रिया या खऱ्या अर्थाने संस्कार शाळा असतात. आईच्या नि सावित्रीबाईंच्या डोळ्याने समाजाकडे पाहिल्यास, अनेक सामाजिक प्रश्न मिटण्यास मदत होईल.

या‌वेळी महाविद्यालयाच्या ‘कर्मज्योती’ या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. स्वप्नील म्हस्के, प्रा. डॉ. भारती काळे व प्रा. रामकृष्ण काळे यांनी केले, तर प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी आभार मानले.

संमेलनातील पुरस्कारार्थी
सावित्रीबाई फुले पुरस्कार- स्नेहल बाळसराफ (तळेगाव दाभाडे), फातिमा शेख पुरस्कार- जस्मिन रमजान शेख (मिरज), ताराबाई शिंदे पुरस्कार - सुरेखा अशोक बोराडे (नाशिक), डॉ. रखमाबाई राऊत पुरस्कार - संगीता बर्वे (पुणे), मुक्ता साळवे पुरस्कार - प्रतीभा जाधव (लासलगाव), लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुरस्कार - वृषाली मगदूम (मुंबई), दुर्गा भागवत पुरस्कार - सरिता पवार (कणकवली), नजूबाई गावित पुरस्कार - सुनिता भोसले (शिरूर), गेल आम्वेट पुरस्कार - बालिका ज्ञानदेव (लोणंद), बाया कर्वे पुरस्कार - शुभांगी गादेगावकर (ठाणे), भूमिकन्या पुरस्कार - स्वाती पाटील (कर्जत).

बातम्या आणखी आहेत...