आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:समशेरपूर गटात अनुसूचित जमातीचे आरक्षण देणे गरजेचे : अशोक भांगरे

अकोले10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या २०२२-२७ कालावधीसाठी घेण्यात येणाऱ्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीतील २८ जुलै रोजी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीवर अकोल्यातील राष्ट्रवादीचे नेते अशोक भांगरे, अमित भांगरे व समर्थक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. समशेरपूर गटातील गावे अनुसूचित जमातीची जास्त लोकसंख्या असलेली असल्याने तेथे सर्वसाधारण व्यक्ती ऐवजी अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची मागणी केली. यासंदर्भात जिल्हाधिकारी व राज्य निवडणुक आयोगाचे सचिवांकडे अशोक भांंगरे यांनी हरकत नोंदवली आहे. वेळ पडल्यास उच्च न्यायालयात धाव घेऊ, असा इशाराही भांगरे यांनी दिला.

भांगरे म्हणाले, २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८ जुलै रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग क्रमांक १ ते ६ जागांसाठीही आरक्षण काढण्यात आले. मात्र ते आरक्षण चुकीचे काढण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने मी हरकत अर्ज दाखल केला आहे. समशेरपूर गटातून अनुसूचित जमातीची लोकसंख्या जास्त असल्याने तेथे सन २०२२ साठी दिलेले सर्वसाधारण हे आरक्षण रद्द करून तेथे अनुसूचित जमातीचे आरक्षण देणे गरजेचे आहे. तसेच पेसा कायद्यानुसार एकूण ६ जागांपैकी ३ जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करणे आवश्यक आहे. म्हणूनच २८ जुलैचे आरक्षण सोडतीस अशोक भांगरे यांनी हरकत घेऊन जाहीर आरक्षण रद्द करून नवीन आरक्षण लागू करण्याची मागणी केली.