आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराहुरीतील डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे ज्यांनी वाटोळे केले, तेच आता कारखाना टिकवण्यासाठी संघर्ष करण्याची भाषा करत असल्याचा आरोप माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केला. माजी खासदार प्रसाद तनपुरे आणि त्यांच्या आघाडीने पंधरा दिवसांपूर्वी संघर्ष करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी जिल्हा बँकेकडे अर्ज करावा. मी स्वतः बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांना विनंती करून तनपुरे यांना कारखाना चालवण्याची परवानगी मिळून देण्यासाठी प्रयत्न करेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
नगर येथे पत्रकारांशी ते बोलत होते. सुमारे १११ कोटींच्या थकबाकीमुळे तनपुरे कारखाना जिल्हा बँकेने दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेतला व त्याला सील ठोकले. या सर्व पार्श्वभूमीवर कर्डिले यांनी तनपुरे यांना कारखाना चालवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.कर्डिले म्हणाले, तनपुरे यांच्या कार्यकाळातच कारखान्यावर ३०० कोटींचा बोजा निर्माण झाला होता. तो खासदार सुजय विखे यांच्यावर ढकलण्याचा प्रयत्न सुरू होता. हे लक्षात आल्यामुळेच खासदार विखे यांनी थांबण्याचा निर्णय घेतला.
पूर्वी कारखाना तनपुरे यांच्या ताब्यात होता. त्यांच्याच काळात ३०० कोटींची थकबाकी निर्माण झाली. कारखाना ‘एनपीए’ मध्ये गेला. पाच वर्षे कारखाना विखे यांनी उत्तम चालवला. ‘एफआरपी’चे १२ कोटी रुपये दिले. कामगारांची थकबाकीही काही प्रमाणात दिली. पंधरा दिवसांपूर्वी तनपुरे व त्यांच्या आघाडीने कारखाना टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असे सांगितले आहे. कामगारांची थकबाकी व ऊस उत्पादकांची देणी सन १९९५ पासूनची आहेत. या काळात जे कारखाना चालवत होते, त्यांनीच आता जबाबदारी घेण्यासाठी पुढे यावे, असेही कर्डिले म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.