आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचा जोर कायम:उत्तर नगर जिल्ह्यात जोर धार बरसला ; पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विशेषतः राहता, कोपरगाव, श्रीरामपूर संगमनेर, अकोले या तालुक्यात बुधवारी रात्री पावसाने दाणादाण उडून दिली. जिल्ह्याच्या अनेक भागात रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. जिल्ह्यात चार मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. संगमनेर तालुक्यातील साकुर ११५, कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव १०९, अकोले तालुक्यातील वीरगाव १०२ तर सर्वाधिक नेवासे १५८ मिमी पाऊस झाला.

गुरुवारी हवामान विभागाने नगर जिल्ह्यात पुढचे तीन दिवस वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. अशी माहिती गुरुवारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी निर्मळ यांनी दिली.

गेल्या पंधरा दिवसापासून नगर शहरासह जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली होती. गेल्या दोन दिवसापासून तुरळक व हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू झाला होता. नगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बुधवारी रात्री दहा वाजता सुरू झालेल्या पावसाचा जोर रात्री उशिरापर्यंत कायम होता. प्रामुख्याने जिल्ह्याच्या उत्तर भागात रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. दरम्यान पुढचे तीन दिवस नगर शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. नगर जिल्ह्यात गेल्या २४ तासात ४० मिलिमीटर पाऊस झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ३८४ मिमी पावसाची नोंद झाली असून, नगर जिल्ह्याच्या उत्तर भागातील अकोले, राहता, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर या तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. कोपरगावमधील गोदावरी नदी पावसामुळे दुथडी भरून वाहू लागली आहे.

२४ तासांत झालेला पाऊस : नगर २०, पारनेर ४२, श्रीगोंदे ४०, कर्जत २१, जामखेड १९, शेवगाव ७, पाथर्डी १८, नेवासे २८, राहुरी २७, संगमनेर ५८, अकोले ७९, कोपरगाव ६३, श्रीरामपूर ८१, राहता ६९ मिलिमीटर
पाऊस झाला आहे.

सखल भागातील नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे
नगर जिल्ह्यात १ ते ३ नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत विजेच्या कडकट्यांसह वादळी वारा व अतिवृष्टीचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. धरणांच्या लाभक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन निर्मळ यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...