आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकचरा संकलन प्रकारात महापालिकेची फसवणूक झाल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला. त्यानंतर महापालिकेच्या वतीने वर्तमानपत्रांमधून खोटी माहिती देऊन खुलासा करण्यात आल्याचा दावा करत शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी अवमान याचिका दाखल करण्यासाठी अर्ज केला आहे. प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी प्रभारी घनकचरा व्यवस्थापन प्रमुख किशोर देशमुख यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिल्याची माहिती जाधव यांचे वकील अॅड. अभिजीत पुप्पाल यांनी दिली.
गिरीश जाधव यांच्या याचिकेवर प्रधान जिल्हा न्यायाधीशांसमोर सुनावणी होऊन स्वयंभू ट्रान्सपोर्ट विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जाधव यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर महापालिकेतर्फे घनकचरा व्यवस्थापन प्रमुख देशमुख यांच्यामार्फत या प्रकरणात खुलासा करण्यात आला होता. ठेकेदार, त्यांचे प्रतिनिधी, तत्कालीन अधिकारी स्वतः किंवा त्यांचे सल्लागार सुनावणीस उपस्थित नव्हते. त्यामुळे न्यायालयात या प्रकरणात योग्य बाजू मांडली गेली नाही. कचरा संकलनाची कोणतेही वाढीव बिले देण्यात आलेली नाहीत. चुकीची बिले अदा करण्यात आलेली नाहीत.
महापालिकेची कोणतीही फसवणूक झालेली नाही, असा दावा महापालिकेकडून करण्यात आला होता.या प्रकरणी जाधव यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल बोरगे, घनकचराचे किशोर देशमुख यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल करण्याबबत अर्ज केला आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होऊन अॅड. पुप्पाल बाजू मांडली. प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी सदर अवमान याचिका दाखल का करू नये, याबाबत म्हणणे सादर करण्यासाठी देशमुख यांना नोटीस बजावली असल्याचे अॅड. पुप्पाल यांनी सांगितले. याप्रकरणी पुढील सुनावणी २३ जून रोजी होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.