आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत जगताप-नागवडे सहमती एक्सप्रेस

अंकुश शिंदे |श्रीगोंदे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काष्टी ग्रामपंचायतची यंदाची निवडणूक ऐन थंडीत राजकीय वातावरण तापवणार असल्याचे चिन्ह असून काल अर्ज माघारीची शेवटची मुदत होती. यात जवळपास १०९ उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले. तर आता १७ जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात असणार आहेत. इतर जागांवर होणाऱ्या लढतींपेक्षा थेट जनतेतून होणार असलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत मात्र जोरदार रस्सीखेच असणार आहे.

आमदार बबनराव पाचपुते यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. तसेच गाव-गाड्यातील राजकारणाच्या दृष्टीने त्यांच्यासाठी ती अस्तित्वाचीसुद्धा असणार आहे. बबनराव पाचपुते यांच्या राजकीय प्रवेशानंतर तब्बल ४० वर्षे ही ग्रामपंचायत त्यांच्याच ताब्यात आहे.

या निवडणुकीत आमदार पाचपुते यांना घरातूनच आव्हान उभे राहिले आहे. त्यांचे पुतणे साजन पाचपुते हे सरपंचपदासाठी आ.पाचपुते यांचे चिरंजीव प्रतापसिंह यांच्याशी दोन हात करणार आहेत. या दोघांच्या समोर डॉ. अनिल कोकाटे हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात असून जातीय समीकरणे पाहता त्यांचे पारडेसुद्धा जड राहणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पाचपुते कुटूंबात राजकीय वारसा हक्कावरुन कलह सुरू असल्याची चर्चा होती. महिनाभरापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम लागल्यानंतर साजन पाचपुते यांनी आपण सरपंचपदाची उमेदवारी करणार असल्याचे अप्रत्यक्ष सुतोवाच केले होते.

परिणामी साजन यांच्या नावाला विरोध असणाऱ्या पाचपुते समर्थकांनी आमदार पाचपुते यांना विनवणी करत प्रतापसिंह यांना पुढे आणण्यासाठी मनधरणी केली होती. याचाच परिपाक प्रतापसिंह यांच्या उमेदवारी निश्चितीने झाला. नाराज झालेल्या साजन यांनी विरोधी गटाशी हातमिळवणी करत आमदार पाचपुते यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे.

साजन यांच्या पॅनलचे सारथ्य कैलास पाचपुते करणार असून त्यांना तालुक्यातील नागवडे-जगताप या दोन्ही नेत्यांची साथ असल्याची खासगीत चर्चा आहे. माजी आमदार राहुल जगताप व राजेंद्र नागवडे यांनी साजन यांना पुढे करण्यासाठी कैलास पाचपुते यांना गळ घातली असल्याने कैलास पाचपुते यांनी साजन यांना सोबत घेऊन निवडणूक करण्याचे ठरवले असल्याचे बोलले जात आहे.

साजन पाचपुते यांचे राजेंद्र नागवडे यांच्याशी संबंध सर्वश्रुत असले तरी नागवडे यांचेच मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या राहुल जगताप यांनी देखील साजन यांच्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांकडे शब्द वापरल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकंदरीत एकमेकांपासून खूप अंतर ठेऊन असलेल्या जगताप-नागवडे यांनी साजन यांना राजकीय चाल देण्यासाठी सहमती एक्सप्रेस चालवली आहे. तालुक्यातील विरोधकांनी एकत्र येत त्यांना घरातून शह देण्याचा चालवलेला प्रयत्न कितपत यशस्वी होतो, ते पाहणे गरजेचे ठरेल.

तालुक्यातील राजकारणाचा इतिहास बदलणार ?
तालुक्याच्या राजकारणात पाचपुते-नागवडे-जगताप संघर्ष आहे. नागवडे कारखान्याच्या निवडणुकीत राजेंद्र नागवडे यांना पराभूत करण्यासाठी पाचपुते-जगताप यांनी छुपी हातमिळवणी केली होती. त्यांच्यासोबत बाळासाहेब नाहटा, केशव मगर, अण्णासाहेब शेलार हे सुद्धा एक होते. परंतु नेते एकत्र येतात तेव्हा कार्यकर्ते आणि जनता विरोधात कौल देते, असा तालुक्याचा इतिहास आहे.

हे नागवडे कारखान्याच्या निवडणुकीत सिद्ध झाले होते. आता काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत जगताप-नागवडे यांची छुपी हातमिळवणी झाली असून त्याला पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील काही नेत्यांचे खतपाणी आहे. त्यामुळे आमदार पाचपुते यांच्याविषयी सहानुभूती वाढण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...