आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर दोन धर्मियांमध्ये तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याप्रकरणी नगर शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यात कालीचरण महाराज उर्फ अभिजीत धनंजय सराग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. १४ डिसेंबर २०२२ रोजी दिल्ली गेट येथे त्यांची सभा झाली होती.
आता पाच महिन्यांनंतर जिल्हा पोलिस प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हेट स्पीच प्रकरणी सरकारने कारवाई करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. त्यामुळे पाच महिन्यांनंतर हा गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात येते.
नक्की प्रकरण काय?
नगर शहरात सकल हिंदू समाजातर्फे १४ डिसेंबर रोजी २०२२ ला हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला कालिपुत्र कालीचरण महाराज आणि गुजरातमधील काजलदीदी हिंदुस्थानी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले होते. कालीचरण महाराजांनी मोर्चानंतर झालेल्या सभेत दोन धर्मीयांमध्ये तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याची फिर्याद पोलिस हेड कॉन्स्टेबल अजय गव्हाणे यांनी दिली. त्यानुसार १५३ (अ) आणि ५०७ (२) या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कालीचरण महाराज रविवारी शेंडीमध्ये?
‘हेटस्पीच’प्रकरणी पाच महिन्यांपूर्वी नगरच्या सभेत केलेल्या वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, कालीचरण महाराज यांचा नगर दौरा पुन्हा जाहीर करण्यात आला आहे. छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त नगर तालुक्यातील शेंडी येथे कालीचरण महाराजांचे व्याख्यान ठेवण्यात आले आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने विशाल हिंदू धर्म जागरण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.