आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बँक म्हणून ओळख असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या बुधवारी (८ मार्च) झालेल्या निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले हे विजयी झाले. या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी, अर्थात महाविकास आघाडीला धक्का दिला. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे तत्कालिन अध्यक्ष उदय शेळके यांचे ११ फेब्रुवारी रोजी मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी बुधवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. जिल्हा उपनिबंधक (सहकार) गणेश पुरी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. अध्यक्षपदासाठी भाजपकडून शिवाजी कर्डिले, तर राष्ट्रवादी (महाविकास आघाडी)कडून माजी आमदार चंद्रशेखर घुले रिंगणात होते. या निवडणुकीत जिल्हा बँकेच्या २० सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना १० मते मिळाली, तर चंद्रशेखर घुले यांना ९ मते मिळाली. एक मत बाद ठरले. सर्वाधिक १० मते मिळवणाऱ्या कर्डिले यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विजयी घोषीत केले.
शिवाजी कर्डिले हे भाजपचे अर्थात विखे गटाचे म्हणून ओळखले जातात, तर चंद्रशेखर घुले हे राष्ट्रवादीचे आहेत. महाविकास आघाडीकडून घुले अध्यक्षपदाच्या रिंगणात होते. आमदार आशुतोष काळे यांचे चंद्रशेखर घुले हे सासरे आहेत. जिल्हा सहकारी बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नगरमध्ये बैठक घेऊन चर्चा केली होती. अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे यावे, यासाठी राष्ट्रवादीने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मात्र, अध्यक्षपद खेचून आणण्यात भाजप, अर्थात विखे गट यशस्वी ठरला आहे.
घुलेंचा पराभव जिव्हारी
जिल्हा बँकेच्या २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत २१ संचालकांपैकी राष्ट्रवादीकडे १०, काँग्रेसकडे ४, भाजप ६, शिवसेना १ असे पक्षीय बलाबल होते. त्यामुळे बँकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, तर उपाध्यक्षपद काँग्रेसकडे गेले होते. महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादीकडे १४मते असतानाही उमेदवार माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना पराभव पत्करावा लागला. घुले यांचा हा पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.