आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर काँग्रेसने गडकरींना पाठवला 2 उड्डाणपुलांचा आराखडा:किरण काळेंची माहिती, म्हणाले - वाहतूक समस्या सोडवण्यासाठी पुलाची गरज

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहरात निर्माण झालेली वाहतूक समस्या सोडवण्यासाठी दोन उड्डाणपुलांची गरज आहे. या दोन्ही उड्डाणपुलांचा आराखडा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठवला आहे, अशी माहिती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

काय म्हणाले काळे?

काळे म्हणाले, शहरातील वाहतूक समस्या पाहता आणि शहरातील स्थानिक नागरिकांची गरज लक्षात घेता सक्कर चौक ते अशोका हॉटेल या उड्डाणपूलाला 1.0 असे संबोधले आहे. कारण उड्डाण पुलाच्या नावाच्या वादात मला पडायचे नाही. हा उड्डाणपूल विक्रमी वेळेत पूर्ण केला तेवढ्याच विक्रमी वेगात 2024 पूर्वीच आणखी दोन उड्डाणपूल उभारावेत. त्यानुसार या दोन्ही उड्डाणपूलांचा नियोजित आराखडा आम्ही तयार केला असून तो, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठवला आहे. उड्डाणपूल 2.0 हा सुमारे न्यू आर्ट्स कॉलेज ते सक्कर चौक असा करण्याची आमची मागणी आहे.

हा उड्डाणपूल आत्ताच्या सक्कर चौक ते अशोका हॉटेल पर्यंतच्या उड्डाणपुलाला जोडण्यात यावा. दुसऱ्या बाजूला नगर कल्याण रोडवर सीना नदीच्या पलीकडे शिवाजीनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये नगर शहराचा नव्याने विस्तार झाला आहे. त्यामुळे जाधव पेट्रोल पंप ते नेप्ती नाका चौकापर्यंत उड्डाणपूल 3.0 करावा अशी, आमची मागणी आहे. तो करत असताना जुन्या नदी पुलाची देखील उंची पूर्वीपेक्षा वाढविणे आवश्यक आहे, असे काळे यांनी सांगितले.

खासदार सुजय विखेंनी लक्ष घालावे

या दोन्ही उड्डाणपुलांची यापूर्वीच उभारणी व्हायला हवी होती. वाहतूक समस्या लक्षात घेता तात्काळ उड्डाणपूल 2.0 व 3.0 चा प्रस्ताव मंजूर करण्याबाबत खासदार डॉ. सुजय विखे यांनी लक्ष घालावे, असेही काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

प्रस्ताव ईमेलने पाठवला

18 व 19 नोव्हेंबर रोजी खा. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी नगर शहरातील कार्यकर्ते व आम्ही सर्व बुलढाणा जिल्ह्यात जाणार आहोत. त्यामुळे गडकरी यांची समक्ष भेट घेणे शक्य नसल्यामुळे दोन्ही पुलांचा आराखडा आणि ई-मेल द्वारे पाठवला असल्याचे किरण काळे यांनी सांगितले.

श्रेय वादात मला पडायचे नाही

ज्याने जे केले आहे, त्याला त्याचे श्रेय मिळाले पाहिजे. स्व. अनिलभैय्या राठोड यांना पहिल्या उड्डाणपुलासाठी केलेल्या पाठपुराव्यासाठीचे श्रेय मोठ्या मनाने द्यायला हवे होते. पण कोणाला श्रेय घ्यायचे त्यांनी ते घ्यावे. श्रेय वादात मला पडायचे नाही.

बातम्या आणखी आहेत...