आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिफ्टींग:बॅग लिफ्टींग प्रकरणी कोतवाली पोलिसांनी दोघांना पकडले

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाळत ठेवून २ लाख ७ हजाराची रक्कम व १३ हजाराचा चेक असलेली बॅग चोरून नेणाऱ्या दोघांना कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले असून एक जण पसार होण्यात यशस्वी झाला आहे. अमोल सोपान जाधव (वय २४), सुभाष बाबासाहेब जगताप (वय ३१) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

उपनिरीक्षक मनोज कचरे, पोहेकॉ गणेश धोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, योगेश खामकर, पोकॉ अमोल गाढे, सुजय हिवाळे, शरद वाघ, सोमनाथ राऊत, संदीप थोरात यांच्या पथकाने रतडगाव (ता. नगर) येथे सापळा रचून आरोपींना जेरबंद केले. फिर्यादी अशितोष खोडदे हे रक्कम असलेली बॅग दुचाकीवरून घेऊन बँकेत भरण्यासाठी जात असताना चाणक्य चौक परिसरात २५ ते ३० वयोगटातील दोन अनोळखी चोरट्यांनी विनाक्रमांकाच्या मोटारसायकलवर येऊन ही बॅग हिसकावून चोरून नेली होती. ही घटना २७ ऑक्टोबर रोजी घडली होती.

याप्रकरणी कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल होता. निरीक्षक संपत शिंदे यांना माहिती मिळाली की, पाळत ठेवून ही चोरी केली असून आरोपी हे रतडगाव येथे आहेत. त्यानुसार पोलिस पथकाने रतडगाव परिसरात सापळा रचला. अमोल जाधव व सुभाष जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर चांगदेव जाधव हा पसार झाला. चोरी केलेल्या २ लाख ७ हजारच्या रक्कमेतून आरोपींनी गणेश लोणारे (रा. कापूरवाडी) यांना ३० हजार तर दिलीप कुऱ्हे (रा. राघू हिवरे , ता. पाथर्डी) यांना १ लाख ७५ हजार रुपये पूर्वीच्या उधारीचे दिले असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...