आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ब्रेकिग:औरंगाबाद-नगर-पुणे ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेसाठी जानेवारीपासून भूसंपादन

बंडू पवार | नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-नगर-औरंगाबाद या नव्या ग्रीन फील्ड “एक्सप्रेसवे’ साठी महसूल विभागाकडून नगर जिल्ह्यातील भूसंपादनासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या असून, पुढच्या पंधरा दिवसात अधिसूचना जारी होऊन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्षात भूसंपादनापूर्वी मोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. पुढच्या तीन वर्षात हा एक्सप्रेसवे पूर्ण होऊन नगरकरांचा पुण्याचा प्रवास सुखकर होणार आहे. विशेष म्हणजे या नव्या एक्सप्रेसवे मुळे नगरकरांना अवघ्या ७५ मिनिटांत पुण्याला जाणे शक्य होणार आहे.

पुणे -नगर -औरंगाबाद ग्रीन फील्ड असा नवा एक्सप्रेसवे तयार होणार असून,२६० किलोमीटरचा हा नवा एक्सप्रेस राहणार आहे. यात नगर जिल्ह्यात १२३ किलोमीटरचा हा एक्सप्रेसवे राहणार आहे. नगर जिल्ह्यातील, नगर, पारनेर, श्रीगोंदे, पाथर्डी, शेवगाव या पाच तालुक्यांचा समावेश राहणार आहे. पुणे जिल्ह्यातील भूसंपादनासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांच्या यापूर्वीच नियुक्ती झाल्या होत्या, औरंगाबाद जिल्ह्यातील नियुक्त्या अद्याप झालेल्या नाहीत. नगर जिल्ह्यात औरंगाबादनंतर शेवगावपासून या एक्सप्रेस वेला सुरुवात होणार आहे.

शेवगाव, पाथर्डी, नगर ,श्रीगोंदे मार्गे पारनेरकडून हा एक्सप्रेसवे जाणार आहे. त्यासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केल्या आहेत. श्रीगोंदे तालुक्यातील भूसंपादनासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पारनेर तालुक्यातील भूसंपादनासाठी पारनेर प्रांताधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पाथर्डी तालुक्यासाठी पाथर्डी प्रांतांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेवगाव तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नगर तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढच्या पंधरा दिवसांत या एक्सप्रेसवे साठी अधिसूचना जारी होऊन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्षात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

अधिसूचना जारी झाल्यावर भूसंपादन प्रक्रिया सुरू होईल
महसूल प्रशासनाने औरंगाबाद -नगर- पुणे या ग्रीन फील्ड एक्सप्रेस महामार्गासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. पुढच्या काही दिवसात जिल्ह्यातील प्रस्तावित जागांच्या भूसंपादनासाठी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात महसूल प्रशासन भूसंपादन प्रक्रिया सुरू करेल. ''-डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी.

सुरत-चेन्नईचे उर्वरित ५ गावांचे भूसंपादन पोलीस बंदोबस्तात
सुरत- चेन्नई या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाची जिल्ह्यातील प्रक्रिया पूर्ण झाली असून, केवळ राहुरी तालुक्यातील खडांबे बुद्रुक, खुर्द, सडे, राहुरी खुर्द व बुद्रुक पाच गावांचे भूसंपादन बाकी आहे. भूसंपादनाला विरोध होत असल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्रशासन आता या चार गावातील भूसंपादन पोलीस बंदोबस्तात करण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्य राखीव दलाला पाचरण करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...