आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मरण:स्व.गोविंदराव आदिक हे स्वतःसाठी नाही तर समाजासाठी जगले; निवृत्ती इंदुरीकर महाराज यांचे निरुपण

श्रीरामपूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मंत्री स्व.खासदार गोविंदराव आदिक यांच्या रूपाने श्रीरामपूर तालुक्याला पडलेले एक विकासाचे स्वप्न होते. जी माणसं स्वतःसाठी जगतात ती जिवंत असूनही मेलेली असतात आणि जी माणसे दुसऱ्यासाठी जगतात ती खऱ्या अर्थाने अमर राहतात आणि त्यांची कीर्तीही अजरामर राहते तसे स्व आदिक होते.त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन अविनाश आणि अनुराधा या बहीण भावंड वाटचाल करीत आहेत. त्यांचा सर्वानी आदर्श घ्यावा तसेच आपण सर्वांनी सामाजिक परिवर्तन घडवून आणले पाहिजे हीच खरी आदिकांना श्रद्धांजली ठरेल, असे निरुपण निवृत्ती इंदुरीकर महाराज यांनी केले.

माजी मंत्री स्व.खासदार आदिक यांच्या ७ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस अविनाश आदिक, साई संस्थानच्या विश्वस्त तथा माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, इंद्रनाथ थोरात, अशोक कानडे, अंजुम शेख, राजेश अलघ, डॉ. रवींद्र जगधने, बबन मुठे, शरद नवले, अरुण नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, अजय डाकले, डॉ. विलास आढाव, ऋषिकेश डावखर, बाळासाहेब तोरणे, अॅड. जयंत चौधरी, कैलास बोर्डे आदी उपस्थित होते. आजकाल राजकारण म्हणजे अर्थकारण झालंय. पूर्वी राजकारणाच्या माध्यमातून सेवा केली जायची आता मेवा कमावला जातो.निवडणुका आल्या की काहीतरी विषय काढून जनतेची माथी भडकवली जातात.आज संकटे माणसावर नाही तर धर्मावर आहेत.धर्म टिकला तर जग टिकेल.मात्र धर्म राजकीय डाव साधून घेण्याचे भांडवल झाले आहे.धर्माचे भांडण लावून राजकीय पोळी भाजायची असा नवा धंदा सुरू झाला आहे.सध्या तर धर्म आणि शेतकरी हे राजकरणाचे भांडवल झाले आहे.

विद्यार्थ्यांना शाळेत आता हरिपाठ शिकवला पाहिजे. हम दो हमारा एक यामुळे विद्यार्थी घटले. मात्र गावोगावी वेड्या बाभळीसारख्या खाजगी शाळा वाढल्या.एका मुलाच्या प्रवेशासाठी चार चार शाळांचे शिक्षक ताकद लावतात असा टोलाही त्यांनी मारला. सूत्रसंचालन संतोष मते यांनी, तर आभार अविनाश आदिक यांनी मानले.

टीआरपीसाठी माणसं संपवू नका
आपले कीर्तन कोणाच्याही भावना दुखावण्याचा नसतात तर समाज सुधारण्यासाठी असतात.मात्र खरे बोलले की सहन होत नाही. टीआरपी साठी इकडून तिकडून जोडाजोडी करून क्लिप बनवली जाते अन दाखवली जाते.दाखवायचे तर संपूर्ण कीर्तन दाखवा.टीआरपी वाढवून पैसे तुम्ही कमावता आणि वाटोळे आमच्यासारख्याचे होते.असा घणाघात त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...