आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या लिंबाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे लिंबाच्या दरांमध्ये वाढ झाली. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबाला रविवारी ८० ते १०० रुपये प्रतिकलो, तर श्रीगोंदे बाजार समितीत ७५ रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे. या भाववाढीचा शेतकऱ्यांना म्हणावा तसा लाभ मिळत नाही. मात्र, किरकोळ बाजारात २०० रुपये प्रतिकिलोने लिंबाची विक्री होत असल्याने उत्पादकांपेक्षा व्यापारीच दुपट्टीने भाव वाढवून संधी साधत असल्याचे चित्र आहे. परिणामी, सर्वसामान्यांना उन्हाळ्यात लिंबू सरबत पिणेही मुश्किल झाले.
नगर जिल्ह्यात फळबाग लागवडीखालील क्षेत्र ७६ हजार १७२ हेक्टर आहे. तर जिल्ह्यात लिंबू पिकाखालील क्षेत्र १२ हजार ४६२ हेक्टर आहे. यामध्ये सर्वाधिक लिंबू पिकाखालील क्षेत्र श्रीगोंदे तालुक्यात आहे. दरम्यान, लिंबाची आवक घटल्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच नगरमध्ये लिंबाच्या दरात वाढ झाली.
नगर बाजार समितीमध्ये मार्चमध्ये लिंबाला ६० ते ८० रुपये किलोप्रमाणे भाव मिळाला. आता एप्रिलच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना ८० ते १०० रुपये किलोने भाव मिळत आहे. श्रीगोंदे बाजार समितीत लिंबाला ७५ रुपये प्रतिकिलोने व्यापारी लिंबाची खरेदी करत आहेत. परंतु किरकोळ बाजारात ग्राहकांना त्यासाठी २०० ते २२० रुपये मोजावे लागत आहेत. आवक कमी असल्यानेही भाव तेजीत असल्याचे पाहायला मिळत आहेत. नगरच्या बाजार समितीत सध्या दररोज एक ते दीड टन आवक होत आहे, तर श्रीगोंदे बाजार समितीत एक टन आवक होत आहे. यापूर्वी साधारणतः रोज तीन ते चार टन आवक होत होती. ती आता निम्म्याने घटली.
आणखी भाव वाढण्याची शक्यता
श्रीगोंदे बाजार समितीत सध्या लिंबाची दररोज एक टन आवक होत आहे. तर लिंबाला प्रतिकिलो ७५ रुपये भाव मिळत आहे. सध्या आवक कमी असल्याने भावात वाढ झाली आहे. यापुढेही लिंबाच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या लिंबाची विक्री जिल्ह्यातच होत आहे. - आदिक वांगणे, व्यापारी, श्रीगोंदे बाजार समिती.
वादळी पावसाचा लिंबू बागांना फटका
मागील दिवसांत राज्यात काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या वादळी वाऱ्याने निम्म्यापेक्षा जास्त फळांची गळ झाली. इतर बहाराच्या तुलनेत उन्हाळ्यात लिंबाला फळधारणा कमी होते. त्यातच उन्हाळ्यात मागणीपेक्षा आवक कमी असल्याने लिंबाच्या भावात वाढ होते. त्यामुळे सध्या लिंबाच्या भावात तेजी आली आहे. परंतु भाव वाढूनही मालच कमी असल्याने शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होत नाही. परिणामी भाव मात्र चांगलेच वधारले आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.