आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील राजूर व परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार होत असून तो मानवी वस्तीत अधिक वाढल्याने शेतकरी व महिला सायंकाळनंतर घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. बिबट्याच्या भीतीने विद्यार्थ्यांचा शाळेतील हजेरीपट कमी होत असून भितीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. वनविभागामार्फत बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आल्यानंतर वनविभागाने परिसरात पिंजरे लावले आहेत. पण बिबटे त्यात अडकलेले नाहीत.
अनेक दिवसांपासून राजूर आणि परिसरातून बिबट्यांचा मुक्त संचार सुरूच आहे. सायंकाळी ६ ते ७ वाजल्यापासूनच बिबटे मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. यातूनच अनेकदा बिबट्यांनी कोंबड्या व कुत्र्यांना ठार करत शिकार केली आहे. या परिसरातून मानवी वस्तीत येऊन भक्ष्य म्हणून हल्ला करण्यापूर्वीच व ते नरभक्षक होण्यापूर्वीच संबंधित बिबट्यांना पिंजऱ्यांत जेरबंद करावे, अशी मागणी राजूर ग्रामस्थांकडून झाल्यानंतरही लावलेले पिंजरे अद्यापपर्यंत रिकामेच आहेत.
बिबट्याचा हल्ला रोखावा म्हणून योग्य निर्णय घेऊन उपाययोजनांबाबत राजूर ग्रामपंचायतच्या सरपंच पुष्पा निगळे, उपसरपंच संतोष बनसोडे, माजी सरपंच गणपत देशमुख, सदस्य अतुल पवार, विजय लहामगे, भाजपाचे राजूर शहराध्यक्ष अक्षय देशमुख, सुनील पंडित, तुषार मैड यांनी वनविभागास निवेदन दिले होते. वनविभागाने राजूर, निळवंडे, दिगंबर परिसरातून बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी दोन दिवसांपासून ठिकठिकाणाहून पिंजरे लावले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.