आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:गौणखनिजासाठी चंदनापुरी ग्रामपंचायतचे तहसीलदारांना पत्र

संगमनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील चंदनापुरी गावात प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ३५, शबरी आवासची ३ व रमाई आवासची ७ अशी ४५ घरकुले गोरगरिबांसाठी मंजूर आहेत. मात्र, घरांच्या बांधकामासाठी लागणारी वाळू, खडी, दगड व मुरूम आदी महत्त्वाचे साहित्य उपलब्ध होत नसल्याने घरकुलांचे बांधकामे रखडले आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी गौणखनिज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी चंदनापुरी ग्रामपंचायतीने तहसीलदार अमोल निकम यांना पत्राद्वारे केली आहे.

तालुक्यातील ५७ स्टोन क्रेशर धारकांना महसूल प्रशासनाने तब्बल ७६५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. उत्खनन झालेल्या गौण खनिजाचे मोजमाप केले असता यामध्ये ५७ स्टोन क्रेशर चालक दोषी आढळल्याने त्यांना तहसीलदार अमोल निकम यांनी दंडाची नोटीस बजावली आहे. दंडाची रक्कम भरण्यासाठी त्यांना महिनाभराची मुदत देण्यात आलेली आहे. महिन्याभरात रक्कम न भरल्यास पुढील कारवाई होणार आहे. मात्र, या कारवाईमुळे गौणखनिज उपलब्ध होत नसल्याने खाजगीसह शासकीय कामे रखडली आहेत.

तालुक्यातील अनेक गावात घरकुल मंजूर असूनही साहित्याअभावी याचा फायदा लाभधारकांना होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. एकीकडे शासनाने घरकुले पूर्ण करण्याचा तगादा लावला असताना दुसरीकडे गौणखनिज व वाहतुकीवर कडक निर्बंध लावले आहेत. शासनाने काही मार्ग काढला नाही तर मागेल त्याला घर हे उद्दिष्ट पूर्ण होणार का, हा प्रश्न सरपंच, उपसरपंच व सदस्यांपुढे पडला आहे. पहिल्या टप्प्यात मंजूर असलेली घरकुले होऊ शकली नाहीत.

चंदनापुरी ग्रामपंचायतने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना तालुक्यातील घरकुल योजना पूर्ण करण्यासाठी गौणखनिज पुरवठ्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, या मागणीचा फॅक्स पाठवला आहे.

आमदार बाळासाहेब थोरात, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे यांना पत्रव्यवहार केला आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी गौणखनिजासाठी ठराव करून प्रस्ताव शासनाकडे पाठवावे, असे आवाहन सरपंच शंकर राहाणे, उपसरपंच भाऊराव राहाणे व सदस्यांनी केले आहे. गौणखनिज उपलब्ध झाले नाही, तर घरकुलांचे काम पूर्ण हाेऊच शकणार नाही, असेही म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...