आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जवाटप:श्रीगोंद्यातील 700 महिलांना दोन कोटी रुपयांचे कर्जवाटप ; चैतन्य महिला बचतगट पतसंस्थेचा उपक्रम

श्रीगोंदे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळा प्रवेश, शेतीची कामे यासाठी सामान्यांना पैशाची गरज भासते. अशावेळी वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेट सोसायटी आणि चैतन्य महिला बचत गटांची सहकारी पत संस्था बचत गटाच्या महिलांना ३० हजार ते १ लाख रुपयांचे कर्ज देतात. हा स्तुत्य उपक्रम असून यातून सामान्यांचे प्रश्न सुटून तालुक्यातील बाजार पेठेत चैतन्य निर्माण होईल, असे प्रतिपादन स्नेहालयचे वरिष्ठ संचालक अनिल गावडे यांनी केले. श्रीगोंदे येथे तालुक्यातील ७०० महिलांना २ कोटी रुपये कर्ज वाटप प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेट सोसायटी संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव वाडगे होते. गावडे म्हणाले, कर्जपुरवठा झाल्यास लोकांचे प्रश्न सुटतात आणि लोकही कर्जाची मुदतीत भरणा करतात. बालविकास प्रकल्प अधिकारी विनोद लोंढे यांनी वाडगे यांच्या महिला सक्षमीकरणाच्या कार्याचा गौरव करून तालुक्यातील महिलांना उद्योजक बनवून तालुक्यातील आर्थिक विकासात महिलांना स्थान मिळवून दिल्याचे सांगितले. वाडगे म्हणाले, जून महिना आणि दिवाळीच्या काळात खर्चाची जुळवाजुळव करताना लोकांना होणारा त्रास पाहून गरजेचे वेळी कर्ज दिले जाते. पहिल्या वर्षी प्रत्येक महिलेला ३० हजार, तर दरवर्षी रक्कम वाढवली जाते. वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेटमध्ये सध्या नियमित कर्ज घेऊन भरणा करणाऱ्या महिलांना १ लाख २० हजार रुपयांचे कर्ज दिले जात आहे. यावेळी नायब तहसिलदारपदी निवड झालेल्या प्रशांत दरेकर यांचा सत्कार करण्यात आला. सायली वाडगे यांनी बचत गटाची माहिती व कर्ज पुरवठा आढावा सादर केला. बचत गटांच्या अध्यक्ष व सचिव यांना अनिल गावडे, प्रशांत दरेकर, लोंढे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन प्रदीप आठरे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...