आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वस्त धान्य वितरण योजनेतील तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडला. शनिवारी रात्री खोसपुरी (ता. नगर) शिवारात ही कारवाई केली. एक लाख ७३ हजार २५० रूपये किंमतीचा २१० गोण्यांमधील १० हजार ५०० किलो तांदूळ, पाच लाख रूपये किंमतीचा ट्रक (एमएच १७ बीवाय ५९६०) असा सहा लाख ७३ हजार २५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अंमलदार सचिन आडबल यांच्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक चालक फारूक फकीर मंहमद शेख (वय ३०), ट्रक मालक कांतीलाल झुंबरलाल भंडारी (वय ५४, दोघे रा. खरवंडी ता. नेवासा) व दुकानदार मुकेश बोरा (रा. वडुले वाघुली ता. शेवगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील ट्रक चालक शेख व मालक भंडारी यांना अटक करण्यात आली आहे.
पांढरीपुल ते शेवगाव रोडवरून शेवगावकडून पांढरीपुलकडे एका ट्रकमधून रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे, अंमलदार विजयकुमार वेठेकर, बापुसाहेब फोलाणे, शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, संतोष लोढे, जालिंदर माने, आडबल, चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या. पथकाने शनिवारी रात्री सव्वा बारा वाजता पंचासमक्ष खोसपुरी शिवारात सापळा लावला.
शेवगावकडून येणारा संशयीत ट्रक पोलिसांनी थांबविला. ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये २१० गोणी तांदूळ मिळून आला. पोलिसांनी ट्रक चालक शेख व मालक भंडारी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता तांदळाचे बिल त्यांच्याकडे मिळून आले नाही. ट्रकसह तांदूळ पोलिसांनी जप्त करत शेख व भंडारी यांना अटक केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.