आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा.. या अभंगाप्रमाणे हिंदु संस्कृतीतील पवित्र संस्कार म्हणजे विवाह. विवाहात मुलीचे आईवडील आपल्या मुलीचे कन्यादान करतात. तसेच पालक आपल्या मुलीला सासरी पाठवताना साश्रूनयनांनी निरोप देतात. मुलीच्या मामांनाही कन्यादान करण्याचा मान आहे. पण लोणी व्यंकनाथ येथे पार पडलेला एक विवाहसोहळा सध्या दोन कारणांमुळे तालुक्यात कौतुकाचा विषय ठरला आहे. एक म्हणजे वधूने शेतकरी असलेल्या वराची केलेली निवड आणि दोन मुस्लिम बांधवांनी केलेले कन्यादान.
विवाहाच्या पाटावर विवाहबंधनात अडकणाऱ्या वधु-वरांच्या पाठीमागे पाठीराखा म्हणून मामा उभे असतात. विशेषतः मुलीचा मामाच्या भावना असतात की मी आतापर्यंत तुझ्या आईच्या पाठीमागे सावली म्हणून उभा होतो, तसाच तुझ्याही पाठीशी असेल. निंभोरे-शिर्के कुटुंबियांच्या विवाहसोहळ्यात मुस्लिम धर्मीय मानलेल्या मामाने तिचे कन्यादान केले. एका उच्च शिक्षित मुलीने शेतकरी मुलाशी विवाहाची रेशिमगाठ बांधली. वडगाव शिंदोडी येथील अब्दुल बाबुलाल सय्यद यांनी मुलीच्या आईला गुरुबहीण मानलेले आहे. त्यामुळे त्यांनी हे कन्यादान केले.
हिंदू संस्कृतीचे सगळे सण उत्सव हे कुटुंब साजरे करते. वधूची आई रक्षाबंधनाला अब्दुल यांना राखी बांधतात. तसेच मुस्लिम समाजातील अनेक उत्सवात आपल्या बहिणीला आवर्जून सन्मानाने बोलावतात. हे धर्म आणि जातीच्या पलीकडे एका आदर्श मानवजातीचे सर्वोत्तम उदाहरण आहे. देशामध्ये अनेक हिंदू मुस्लिम कुटुंबं गुण्यागोविंदाने एकत्रित नांदतात. एकमेकांना सर्वतोपरी मदत करतात. ग्रामीण भागातील मुस्लिम बांधव ग्रामदैवताचा उपवास करतात. एकमेकांच्या सण, यात्राेत्सवात मनापासून भाग घेतात. ही एकतेची भावना समाजाला दिशादर्शक आहे.
शेतकरी मुलगा चालेल
एकीकडे शेतकरी मुलांनी वधू मिळत नसल्याची तक्रार एेकायला मिळते. पण, कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी सहकारी कारखान्याचे संचालक जालींदर निंभोरे यांनी पुतणे आकाशचा विवाह निश्चित करताना वृषालीला विचारले, तेव्हा तिने मुलगा शेतकरी असलेला चालेल फक्त निर्व्यसनी असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. आणि दोघांच्या होकारानंतर नुकताच हा विवाह लोणी व्यंकनाथला संपन्न झाला. वृषाली उच्चशिक्षित असून तिने विज्ञान शाखेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.