आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त ​​​​​​​:लग्नाचे आमिष दाखवून मारहाण करीत 2 लाखांचा ऐवज लुटला; आरोपी फरार

पारनेर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नासाठी मुलगी दाखवण्याचे आमिष दाखवून,निर्जन ठिकाणी नेत चौघांना मारहाण करीत १ लाख ९१ हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना नगर तालुक्यातील वाकोडी येथे घडली. याप्रकरणी पारनेर पोलिसांनी रामदास उमाप (पुणेवाडी, पारनेर) अटक केली आहे‌. उर्वरित आरोपी फरार आहेत.

यासंदर्भात बबुशा गहिना रेपाळे यांनी पारनेर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ४ जून रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शेळ्या चारत असताना पुणेवाडी येथील रामदास उमाप व अशोक चंदर आढाव ( राळेगणथेरपाळ, पारनेर ) हे तेथे आले. रेपाळे यांची बायको मतिमंद असल्याने तुम्हाला दुसरी बायको करायची का असे विचारले. बायको मतिमंद असल्याने, तिला घरातील काम जमत नसल्याने दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता ते दोघे पुन्हा बबुशा यांच्याकडे आले. मुलगी पहायला जायचे आहे, असे सांगून मुलीच्या वडिलांना एक लाख रूपये द्यावे लागणार असल्याने पैसे बँकेतून काढून आणण्यास त्यांनी भाग पाडले. नगरला जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यास तसेच मुलगी पसंत पडली तर उरकून येऊ त्यासाठी मंगळसुत्रही विकत घ्या,असे फर्मान दोघांनी सोडले.

लग्न करायचे असल्याने बबुशा यांनी चुलत भाऊ जालिंदर यांच्या मार्फत सोबलेवाडी येथील विजय बाबाजी शेरकर यांची तवेरा कार भाड्याने मागवून घेतली.या वाहनातून भिका राघू रेपाळे, बजाबा पाटीलबा रेपाळे, मारूती गहिना रेपाळे यांच्यासह रामदास उमाप याची पत्नी शिलाबाई उमाप हे नगर येथे गेले. तर रामदास उमाप व अशोक आढाव हे दोघे मोटारसायकलवर आले. नगरमध्ये बाजार समिती परिसरात पोहचल्यावर तवेराचा चालक विजय शेरकर याने अशोक आढाव यास फोन करून बाजार समिती परिसरात येण्यास सांगितले. काही वेळानंतर अशोक व रामदास तेथे पोहचले.

त्यानंतर अशोक आढाव वाहनात बसला. वाकोडी शिवारातील शेतामध्ये तो सर्वांना घेऊन गेला. येथे मुलगी आहे असे सांगत त्याने सर्वांना खाली उतरवले. तेथे अशोक व रामदास याचे पाच ते सहा साथीदार उपस्थित होते. आरोपींनी बबुशा यांच्या खिशातील दहा हजार रुपये, ५ ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र, विजय शेरकर याचा १२ हजार ५०० रुपयांचा मोबाईल,भिका रेपाळे यांच्याजवळील ५० हजार रूपये, त्यांच्याकडेच ठेवण्यासाठी दिलेले १ लाख रुपये, मारूती गहिना रेपाळे यांच्या खिशातील ४ हजार रूपये काढून घेण्यात येऊन गाडीत बसून निघून जाण्यास सांगितले. पारनेर ठाण्यात उमाप, चंदर आढाव तसेच इतर पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...