आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्..तो कुटुंबाला भेटला साडेतीन वर्षांनी:पश्‍चिम बंगालमधून हरवला, अहमदनगरमध्ये सापडला; 'सत्यम'ला पाहताच पालकांना आनंद

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

साडे तीनवर्षापूर्वी पश्‍चिम बंगालमधून हरवलेल्या सत्यम या मनोरुग्ण युवकाला अहमदनगरच्या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पाने आधार देऊन व उपचार करुन त्याचे कुटुंब शोधले. मंगळवारी (ता. 30 ऑगस्ट) त्याचे वडील, चुलते, बहिण आणि पश्‍चिम बंगालचे पोलिस थेट अहमदनगरच्या अरणगाव येथील मानवसेवा प्रकल्पात पोहचले. श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पाने कायदेशीर कारवाई करुन सत्यमला त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले.

सत्यमला पाहिल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. एक 25 वर्षाचा युवक मानसिक अस्वस्थतेमुळे, मनावर मोठा ताण घेऊन वेगळ्याच विश्‍वात वावरतांना अरणगाव (मेहराबाद) येथील ग्रामस्थांना दिसला होता.

अरणगाव येथील ज्ञानेश्‍वर पुंड यांनी या युवकाची माहिती देताच श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या स्वयंसेवकांनी धाव घेऊन रस्त्यावरील आयुष्य जगणार्‍या युवकाला ताब्यात घेतले. संस्थेच्या मानवसेवा प्रकल्पात दाखल केले. मानवसेवा प्रकल्पाने या युवकाला पोषक वातावरणात अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य सुविधा पुरविल्या.

मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर व डॉ. सुरेश घोलप यांनी या मनोरुग्ण युवकावर उपचार केले. उपचाराने सावरल्यानंतर संस्थेचे स्वयंसेवक प्रविण देशमुख, ईश्‍वर भोईर, मंगल गायकवाड व संस्थेच्या अध्यक्षा पुजा मुठे यांनी समुपदेशन केले. समुपदेशनातून मिळालेल्या माहितीनुसार सत्यम हा युवक पश्‍चिमबंगाल मधील नारायणपूर (जि. बिरभूम) येथील असल्याचे समजले.

या युवकाने नाव गाव पत्ता सांगताच संस्थेचे स्वयंसेवक प्रविण देशमुख, अंबादास गुंजाळ यांनी पश्‍चिमबंगाल मधील बिरभूम पोलीसांशी संपर्क केला. मानसिक भान हरवलेल्या या तरुणाची त्याच्या कुटुंबाने पश्‍चिम बंगाल मधील मल्लारपुर पोलीस स्टेशन येथे 25 फेब्रुवारी 2019 रोजी सत्यम हरवल्याची नोंद केली. मल्लारपुर पोलिस व कुटुंबाने सत्यमचा शोध घेतला, परंतु सत्यम तेव्हा सापडला नव्हता. मुलगा सापडल्याने त्याच्या कुटुंबियांनी संस्थेसह सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...