आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोळी जेरबंद:मध्यप्रदेशातील गुन्हेगारांची टोळी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश

नगर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रात्रीच्या वेळी महामार्गावर थांबलेल्या मालवाहतूक ट्रक चालकास मारहाण करून डिझेल चोरी व इतर गंभीर गुन्हे करणारी मध्यप्रदेश येथील टोळी मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या टोळीमध्ये सहा चोरट्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून चारचाकी वाहनासह डिझेलने भरलेले ड्रम पोलिसांनी जप्त केले आहेत.

राजाराम गंगाराम फुलेरीया (वय ३८), धमेंद्र शिवनारायण ऊर्फ शिवलाल सोलंकी (वय २७), राहुल जुगलकिशोर चंदेल (वय २१, रा. रामदुपाडा ता. मोहन वरोदिया, जि. साजापूर, मध्यप्रदेश), अशोक रामचंदर मालवीय (वय २१), गोविंद पिरूलाल मालवीय (वय ३०, दोघे रा. सांगवीमाना, ता. जि. साजापूर, मध्यप्रदेश) व अनिकेत राजेश बोरनार (वय २४, रा. उस्थळ दुमाला, ता. नेवासे) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. यातील धमेंद्र सोलंकी, अशोक मालवीय, गोविंद मालवीय व राजाराम फुलेरीया हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध नेवासे, सोनई, लोणी, औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड, पैठण, नागपूर जिल्ह्यातील कळमना, मौंडा, सोनेर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल आहेत. २० जून रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपासकामी मध्यप्रदेशकडे जात असताना त्यांना वडगाव गुप्ता (ता. नगर) शिवारात मालवाहतूक ट्रकच्या जवळ एक चारचाकी वाहन उभे असताना दिसले. तेथे संशयास्पद हालचाली होत असल्याचे गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर चोरटे वाहनासह पळून जात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला.

पोलिसांचा पाठलाग होत असल्याचे पाहून चोरट्यांनी त्यांच्याकडील वाहन राहुरी-शिंगणापूर रोडवर सोडून अंधाराचा फायदा घेत पळून गेले होते. निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार संदीप घोडके, मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, संदीप दरदंले, रवी सोनटक्के, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप चव्हाण, मेघराज कोल्हे, शिवाजी ढाकणे, रणजित जाधव, उमाकांत गावडे यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. चोरटे हे चांदा शिवारात कैलास दहातोंडे यांच्या वस्तीवर भाडेतत्वावर राहत होते. त्यानुसार पोलिसांनी पाठलाग करून चोरट्यांना अटक केली.

बातम्या आणखी आहेत...