आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बियाणाचा तुटवडा:महाबीजच्या सोयाबीन बियाणाचा जिल्ह्यात तुटवडा, कृषी महाबीजकडून नगर जिल्ह्यासाठी सोयाबीनचे 7हजार क्विंटल बियाणे उपलब्ध

नगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील वर्षी झालेली अतिवृष्टी व काढणीला पीक आल्यावर झालेला अवकाळी पाऊस यामुळे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या अर्थात महाबीजच्या अहमदनगर जिल्ह्यातील सोयाबीन, उडीद, मुगाच्या बीजोत्पादन प्लॉटला फटका बसला. त्यामुळे सोयाबीन व उडदाच्या बिजोत्पादनात घट झाली असून जिल्ह्यात या बियाण्यांचा तुटवडा भासत आहे. वितरकांनी मागणी २८ हजार क्विंटल असताना यावर्षी महाबीजकडून फक्त ७ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याचा पुरवठा झाला. यापैकी महाबीजने जिल्ह्याच्या कृषी विभागाला ३ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे प्रात्यक्षिकासाठी दिले. उर्वरित ४ हजार क्विंटल बियाणे वितरकांना उपलब्ध करून देण्यात आले.


जिल्ह्यात या खरीप हंगामात १ लाख २४ हजार ८०४ हेक्‍टर सोयाबीन पेरणीचे नियोजन आहे. यासाठी जिल्ह्याची एकूण ७० हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची मागणी आहे. दरवर्षी सोयाबीन बियाण्याच्या पुरवठ्यात महाबीजचा ६० टक्के वाटा असतो. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने जिल्ह्यामध्ये मागील वर्षी २७०० हेक्टरवर सोयाबीनच्या बीजोत्पादनाचे प्रकल्प राबवले. यातून १८ हजार क्विंटल बीजोत्पादन झाले. यापैकी गुणात्मकदृष्ट्या चांगले बियाणे कमी मिळाले. उन्हाळी हंगामात महाबीजने जिल्ह्यात ७५० हेक्टरवर बीजोत्पादन केले. यातून महाबीजला फक्त ३०० क्विंटल बियाणे मिळाले. बीजोत्पादनासाठी महाबीज शेतकऱ्यांकडून प्रमाणित बियाणे प्रतिक्विंटल ७ हजार ८०० रुपये, तर पायाभूत बियाणे ८ हजार ४०० रुपये दराने खरेदी करते. खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील वितरकांनी महाबीजकडे २८ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची मागणी केली होती. परंतु जिल्ह्यात महाबीजकडून ७ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले. उडीद बियाणाची वितरकांनी १५ हजार क्विंटलची नोंदणी केली होती. परंतु महाबीजकडून ७५० क्विंटल वितरकांना पुरवठा करण्यात आला.


अतिवृष्टी व अवकाळी पावसाचा महाबीजच्या बीजोत्पादनाला फटका
महाबीजच्या बियाण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान
महाबीजच्या बियाणावर कृषी विभागाच्या वतीने प्रात्यक्षिकासाठी अनुदान दिले जाते. सोयाबीनची ३० किलो बॅगेची किंमत ४२०० रुपये आहे. अनुदानावर ही बॅग २८५० रुपयाला मिळते. मुगाच्या २ किलोची बॅग दर ३०० रुपये आहे. अनुदानावर २०० रुपयाला मिळते. ५ किलोची उडीद बॅग किंमत ७५० रुपये आहे, अनुदानावर ती ५०० रुपयाला मिळते. २ किलो तूर बॅगेचा दर २८० रुपये असून अनुदानावर ती १८० रुपयाला मिळते. मका ४ किलो बॅग ६५० रुपये किंमत असून अनुदानावर ३४० रुपयाला मिळते. भाताची २५ किलोची बॅग किंमत ९२५ रुपये आहे, ती अनुदानावर ४६२ रुपयाला मिळते.


महाबीजच्या या वाणाला मागणी
सोयाबीनमध्ये फुले संगम केडीएस-७२६, फुले किमया केडीएस -७५३, एमएयूएस -१६२, डीएस २२८ फुले कल्याणी, एमएसीएस ११८८, एमयुएस ७१, जेएस ३३५, जेएस ९३०५, एमएयुएस ६१२ हे वाण आहेत. मकामध्ये उदय, बाजरीमध्ये धनशक्ती, भातामध्ये इंद्रायणी, उडीद टीएयू-१, एकेयू १०-१, तूर-बीडीएन ७११, मूग -उत्कर्षा ही वाण आहेत.


भात, बाजरी व तूर या पिकांचे बियाणे मुबलक
भाताच्या बियाणाची वितरकांनी ६०० क्विंटल नोंदणी केली होती. महाबीजने ६५० क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले. बाजरीचे बियाणाची वितरकांनी २०० क्विंटलची नोंदणी केली होती. प्रत्यक्षात १५३ क्विंटल बियाणे दिले. तुरीच्या बियाणाची वितरकांनी ४०० क्विंटल मागणी केली होती. महाबीजने प्रत्यक्षात २६४ क्विंटल तुरीचे बियाणे दिले. जिल्ह्यात प्रात्यक्षिकासाठी मुगाचे ४० क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले, अशी माहिती महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक रवींद्र जोशी यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...