आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा सरकारला सल्ला:चंद्रकांत पाटील म्हणाले, 2019 च्या महापुरात आम्ही बोटीत बसून निर्णय करायचो, तुम्हीही फिल्डवर उतरा! त्याचवेळी बोटीतील सेल्फीमुळेच ट्रोल झाले होते भाजपचे मंत्री

अहमदनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2019 मध्ये बोटीतील सेल्फीमध्ये ट्रोल झाले होते भाजपचे मंत्री

राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक दुर्घटना घडत असल्याचे समोर येत आहे. राज्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे. दरम्यान आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील मंत्र्यांना आवाहन केले आहे. आम्ही बोटीत बसूनच निर्णय घेऊन प्रशासनाला कामाला लावायचो, आताही तशीच भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. तुम्हीही डायरेक्ट फिल्डवर उतरा असा सल्ला पाटलांनी दिला आहे.

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटलांनी राज्यातील मंत्र्यांना हा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, '2019 साली महापूर आलेला होता तेव्हा 15 दिवस पाणी ओसरलेले नव्हते. मी आणि तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट फिल्डवर काम करत होतो. हेलिकॉप्टर, बोटीच्या माध्यमातून आम्ही पोहचलो होतो. अनेक वेळा पाण्यात बसून आम्ही निर्णय घ्यायचो. त्यावेळी आमच्यावर काँग्रेसकडून टीका केली जात होती. आता तुम्ही सत्तेत आहात. तात्काळ निर्णय घ्या, लोकांना मदत करा' असे आवाहन चंद्रकांत पाटलांनी केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी वॉररूममध्ये बसून निर्णय घ्यावेत
चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, 'अनेक इमारती पाण्यात गेल्या आहेत. मात्र आमचे मुख्यमंत्री मातोश्रीमध्येच बसलेले आहेत. ते वर्षा निवासस्थानीही नाहीत. मंत्रालयामध्येही ते नाहीत. मी सकाळी 7 वाजताच मंत्रालयात जाऊन कामाला लागत होतो. हा विषयी राजकारणाचा नाहीये मात्र उद्धव ठाकरेंनी मंत्रालयात येऊन वॉररूममध्ये बसून वेगवेगळ्या विभागाशी बोलायला हवे. त्यांच्याकडून आढावा घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना त्यांनी केल्या पाहिजे. आम्ही सरकारला कधीही मदत करायला तयार आहोत. मात्र त्यांना कोणाची मदत नको असते. आम्ही सढळ हाताने मदत करायला तयार आहोत' असेही चंद्रकांत पाटलांनी म्हटले आहे.

2019 मध्ये बोटीतील सेल्फीमध्ये ट्रोल झाले होते भाजपचे मंत्री

2019 मध्ये पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला होता तेव्हा भाजपचे सरकार होते. यावेळी तत्कालिन मंत्री गिरीश महाजन यांना एका व्हिडिओमुळे टीकेचा सामना करावा लागला होता. सांगलीतील पूरग्रस्त भागांची पाहणी करत असताना त्यांनी हसत हसत सेल्फी घेतला होता. हा सेल्फी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

बातम्या आणखी आहेत...