आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंत पाटील यांचे आश्वासन:महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ओबीसी समाजाची जनगणना पूर्ण करु

अहमदनगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ओबीसी समाजाची जनगणना पूर्ण केली जाईल, असे आश्वासन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी दिले. दरम्यान ओबीसी मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले ओढून-ताणून आलेले शिंदे-फडणवीस सरकार राज्याच्या जनतेला अजिबात रुचलेले नाही. त्यामुळे जनतेच्या मनात माेठा राेष निर्माण झाला आहे. अशी टीका पाटील यांनी केली.

अहमदनगर येथे आयोजित सावता परिषदचे 5 वे त्रेवार्षिक अधिवेशन व माळी समाज मेळाव्यात पाटील बोलत होते. आमदार संग्राम जगताप ,आमदार प्राजक्त तनपुरे, सावता परिषदचे अध्यक्ष कल्याण आखाडे , प्रदेशाध्यक्ष मुयर वैद्य, उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र राहुल जावळे ,जिल्हाध्यक्ष निखिल शेलार, भगवान फुलसुंदर, शरद झोडगे आदी उपस्थित होते.

माेठे यश मिळेल

मेळाव्याच्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, आगामी काळात हाेणाऱ्या लाेकसभा, विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढल्यास आघाडीला माेठे यश मिळेल, असा विश्वास ही पाटील यांनी व्यक्त केला.

सरकारची घाबरगुंडी उडाली

पाटील म्हणाले, राज्याच्या जडणघडणीत माळी समाजाचे याेगदान माेठे आहे. ओबीसी समाजाचे जातीनिहाय जनगणना व्हावी, ही माळी समाजाची मागणी आहे. ती मागणी सरकार सत्तेवर आल्यावर धसाला लावण्याचे काम राष्ट्रवादी पक्ष करेल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सातत्याने पुढे ढकलण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. मुळातच आगामी काेणत्याही निवडणुका घेण्यासाठी सरकारची घाबरगुंडी उडाली आहे. अशी टीका पाटील यांनी यावेळी केली.

कांद्याच्या प्रश्नाबाबत सरकारचे थातूरमातूर उत्तरे

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, कांद्याच्या कोसळलेल्या भावाबाबत सरकार थातूर-मातूर उत्तरे देत आहे. समिती नेमण्याचं आश्वासन दिलं. परंतु समिती नेमेपर्यंत सामान्य शेतकरी कांदा हा विकेल कारण त्याला दुसरा पर्याय नसताे. त्यामुळं ताे कांदा व्यापाऱ्याकडे जावून व्यापाराचं हित संवर्धन करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाचे सरकार करीत आहे, अशी टीकाही पाटील त्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...