आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पर्धेच्या व धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती व्यायामापासून दुरावत असून, ताण-तणावाखाली वावरत आहे. चुकीची आहार पध्दती, व्यायामाचा अभाव व तणावपूर्ण जीवनामुळे बहुतेकांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. निरोगी आरोग्यासाठी एक दिवसापुरता योग न करता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य अंग बनवा, असे आवाहन योग गुरु सागर पवार यांनी केले.
जागतिक योग दिनाचे औचित्य साधून रविवारी शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुलमध्ये योग सोहळा पार पडला. महिला-पुरुषांसह तरुणाईने या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन योगाचे धडे गिरवले. त्यावेळी ते बोलत होते. पहाटे ६ वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, योग गुरु सागर पवार व देवा सर यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन झाले.
प्रारंभी मुलींनी गणेश वंदना सादर केली. तर गिरीराज जाधव यांनी सादर केलेल्या सत्संगने वातावरण प्रफुल्लित व प्रसन्न झाले. योग गुरु सागर पवार यांनी मंत्रोच्चाराने योगाची सुरुवात केली. यात सुर्यनमस्कार, वीरभद्रासन, उत्कटासन, उत्तरासन, सेतुबंधासन, नटराजासन, त्रिकोनासन आदी आसने प्रात्यक्षिकांसह योग साधकांकडून करुन घेतले. अवघड असलेले विविध आसने त्यांनी सोप्या पध्दतीने करण्याचे प्रात्यक्षिक दाखवून त्याचे महत्त्व व निरोगी शरीरासाठी असलेले फायदे सांगितले.
देवा सर यांनी बदलत्या जीवनशैलीत आरोग्यासाठी वरदान असलेल्या प्राचीन भारतीय योग चिकित्सेला संपूर्ण जगाने स्वीकारले. कोरोना काळात अनेक रुग्णांनी योग-प्राणायामचा अवलंब केल्याने त्यांच्यात लवकर सुधारणा होऊन ते बरे झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. उत्तम आरोग्यासाठी योग-प्राणायाम दररोज करण्याचे त्यांनी सांगितले. जीवन निरोगी व शरीर सदृढ राहण्यासाठी नागरिकांमध्ये योग-प्राणायामाची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्राणायाम व शवासनने योग शिबिराचा समारोप करण्यात आला. सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर व मृणाल कुलकर्णी यांनी, तर आभार गायत्री गार्डे यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.