आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद जिल्ह्यातील कारागृह पोलिस दलाच्या भरतीसाठी आयोजित लेखी परीक्षेला ‘आयफोन’चा वापर करत प्रश्नपत्रिका लीक करणाऱ्या उमेदवाराला तोफखाना पोलिसांनी जेरबंद केले. विकास परमसिंग बारवाल (रा. नांदी, ता. अंबड, जि. जालना) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून आयफोन व अत्यंत छोटे इअरफोन्स जप्त करण्यात आले. त्याने चपलेत लपवून माेबाइल आत नेला होता.
लालटाकी रोड परिसरात रेसिडेन्शियल केंद्रावर हा प्रकार घडला. आणखी एका कॉपीबहाद्दरालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. नगरमध्ये विविध केंद्रांवर कारागृह पोलिस दलाची लेखी परीक्षा होती. रेसिडेन्शियल केंद्रावर परीक्षा सुरू झाल्यानंतर एका कक्षात सुपरवायझर म्हणून नियुक्त शिक्षकांना एका उमेदवाराकडे मोबाइल असल्याचे आढळून आले. पर्यवेक्षिका वर्षा विजयकुमार परदेशी यांनी उमेदवार विकास बारवाल याच्या ताब्यातून आयफोन मिनी जप्त केला. तसेच त्याच्या कानात छोट्या आकाराचे इअरफोन्स होते. विकासने एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रश्नपत्रिकेचा फोटो पाठवला होता. या ग्रुपमध्ये ३ सदस्य होते. परदेशी यांनी पोलिसांना बोलावून विकासला त्यांच्या ताब्यात दिले. सायंकाळी परदेशी यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली.
शहर विभागाचे प्रभारी पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनात तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत. याशिवाय याच परीक्षा केंद्रावर एका उमेदवाराला कॉपी करताना पोलिसांनी पाहिले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे कागद आढळून आला. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
‘डमी’ उमेदवार पळाला
दादासाहेब रूपवते परीक्षा केंद्रावर नीलेश कमल सुरदंडे (रा. टाकळेवाडी, जि. औरंगाबाद) हा डमी उमेदवार परीक्षेसाठी आला. तो गणेश सुरेश भवर (रा. टाकळी कदीम, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) या उमेदवाराच्या जागी परीक्षा देण्यासाठी आला होता. परंतु, परीक्षा केंद्रात प्रवेश करताना ओळखपत्र तपासून पाहत असतानाच तो डमी असल्याचे लक्षात आले. मात्र, त्याने तत्काळ पलायन केले. त्याच्याविरुद्धही तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.