आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:मविआने केले महावितरणचे गेट बंद

नगर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे जून ते नोव्हेंबर या कालावधीतील वीज बिल माफ करावे या मागणीसाठी महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली. नगर येथील महावितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडून मंगळवारी दुपारी गेट बंद केले. लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. दोन दिवसांत मागण्या मान्य झाल्या नाही, तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

जून ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या पावसामुळे शेतातील पिके उद्ध्वस्त झाली. या कालावधीत शेतकऱ्यांना वीज पंप सुरू करण्याची गरजच भासली नाही. त्यामुळे या कालखंडातील शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे ही मागणी यापूर्वीच महाविकास आघाडीने केली होती. परंतु बिल माफी बाबत निर्णय न घेता वीजबिल वसुलीसाठी रोहित्र बंद करण्याचा निर्णय महावितरण घेतला. हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे, त्यामुळे बिल माफीसह रोहित्र बंद करण्याचे धोरण रद्द करावे, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याने, कार्यकर्त्यांनी दुपारी तीन ते ५ वाजेपर्यंत गेट बंद करण्याचा पवित्रा घेतला. यावेळी पोलिस बंदोबस्तही होता. महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील काकडे यांची भेट घेऊन आंदोलकांनी भूमिका मांडली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके, प्रताप शेळके, संपत म्हस्के, शरद झोडगे, बाळासाहेब हराळ, सदस्य संदेश कार्ले, शरद पवार, प्रकाश पोटे, रोहिदास कर्डिले, सीताराम काकडे आदी उपस्थित होते.

मागण्यांबाबत वरिष्ठ कार्यालयाला अवगत करणार
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत वरिष्ठ कार्यालयाला अवगत केले जाणार आहे. त्यानुसार वरिष्ठांकडून आलेल्या सूचना दोन दिवसात कळवण्यात येतील त्यामुळे आंदोलन स्थगित करावे, असे लेखी आवाहन महावितरणाचे अधीक्षक अभियंता सुनील काकडे यांनी आंदोलकांकडे केली.

बातम्या आणखी आहेत...