आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:केंद्राच्या योजनांचे श्रेय ‘मविआ’ घेतेय, केंद्राच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात खासदार कमी पडताहेत का? : कर्डिले

करंजी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जल जीवन मिशन ही नळ पाणी योजना केंद्र सरकारची योजना आहे. या माध्यमातून विविध गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी निधी दिला जात आहे. राज्य सरकार सोयीनुसार या योजनेसंदर्भात केंद्र सरकारवर टीका करते. परंतु कोट्यवधीचा निधी याच जल जीवन मिशन योजनेंतर्गत मिळाला तर त्याचे श्रेयही महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी घेतात. मात्र आपले खासदार तोंड का उघडत नाहीत ? केंद्र सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागासाठी दिल्या जाणाऱ्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात खासदार कमी पडत आहेत का ? असा सवाल उपस्थित करत माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी नाव न घेता खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावरच निशाणा साधत त्यांना घरचा आहेर दिला आहे.

पाथर्डी तालुक्यातील निंबोडी फाटा येथे शशिकला बाबुराव भापसे प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे आयोजित बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन रविवारी माजी आमदार कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कर्डिले म्हणाले, ऊर्जा राज्यंमत्र्यांनी जनता दरबार घेऊन अधिकाऱ्यांना वेठीस धरले जात आहे. या जनता दरबारातून सर्वसामांन्याचे किती प्रश्न सोडवले याची माहिती माध्यमांना द्यावी. जनता दरबाराचा फार्स केला जात आहे. शेतकऱ्यांचा महाविकास आघाडी सरकारकडून भ्रमनिरास झाला आहे. केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन नळपाणी योजनेंतर्गत मोठा निधी मिळत आहे त्याचे श्रेय राष्ट्रवादीचे आमदार घेत आहेत. योजना केंद्र सरकारची आहे तर मग खासदार का गप्प आहेत. केंद्र सरकारच्या योजनेमुळे कोटयवधी रुपयांचा निधी मिळत असेल त्याचबरोबर गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असेल ते जनतेला सांगण्यात खासदार कमी पडत आहेत की काय असा सवाल कर्डिले यांनी उपस्थित करत. मंत्री तनपुरे बरोबरच खासदार विखेंवरही निशाणा साधल्याने पाथर्डी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

युवा नेते कुशल भापसे यांनी माजी आमदार बाबुराव भापसे, प्रमोद भापसे व आमदार प्रसाद लाड यांच्या प्रेरणेने पाथर्डी तालुक्यात अनेक सामाजिक उपक्रम हाती घेत १४ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, ५१ अनाथ मुलांचे बारावीपर्यंत मोफत शिक्षण असे राबवलेले समाजाभिमुख सामाजिक उपक्रम कौतुकास पात्र असल्याचे कर्डिले यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम आठरे, चेअरमन बाळासाहेब लवांडे, माजी सरपंच भाऊसाहेब लोखंडे, धीरज मैड, पंकज मगर, नगरसेवक अण्णासाहेब भापसे, कुणाल भापसे, भास्कर पाठक, संतोष चोभे, भाऊसाहेब शेलार, चव्हाण, डॉ. नितीन ढमाळ उपस्थित होते.

मंत्रिपद कार्यकर्ते, अधिकाऱ्यांपुढे मिरवण्यापुरतेच आहे का?
राहुरी मतदार संघाचे लोकप्रतिनिधी राज्याचे ऊर्जामंत्री आहेत. तरी देखील थकबाकीचे कारण पुढे करत शेतकऱ्यांच्या शेती पंपाचा वीज पुरवठा बंद केला जात आहे. दोन तास देखील पूर्ण दाबाने वीज मिळत नाही अनेक मोठ्या नळ पाणी योजना वीज बिल थकले म्हणून आठ-पंधरा दिवस बंद केल्या जात आहेत. मंत्रिपद कार्यकर्ते अधिकाऱ्यांपुढे मिरवण्यापुरते आहे का, असा सवालही कर्डिले यांनी यावेळी उपस्थित केला.

बातम्या आणखी आहेत...