आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य:शहरात मनपामार्फत गोवर लसीकरण अभियान

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात बालकांमध्ये गोवर आजाराची लक्षणे आढळून आल्याने महापालिका प्रशासनाने उपाययोजनांबाबत वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. आयुक्त पंकज जावळे यांनी बुधवारी महापालिकेत बालरोग तज्ज्ञांची बैठक घेतली. दरम्यान, महापालिकेकडून डिसेंबर व जानेवारी महिन्यात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली.

शहरात लहान मुले व बालकांमध्ये व्हायरल फ्लूचे प्रमाण वाढले आहे. त्यातच गोवर संशयित ४० बालकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर दक्षतेचा भाग महापालिका प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. आयुक्त जावळे यांनी शहरात १५ ते २५ डिसेंबर दरम्यान पहिला डोस व १५ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान दुसरा डोस अशा पद्धतीने व्यापक स्वरूपात लसीकरण अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

खासगी रुग्णालये व डॉक्टरांचेही या अभियानात सहकार्य घेण्यात येणार आहे. शहर अंदाजे ३ ते ४ हजार लहान बालके असून, त्यादृष्टीने नियोजन करून मनपाची आरोग्य केंद्रे व इतर काही सेंटरवर लसीकरणाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे डॉ. बोरगे यांनी सांगितले. तसेच १३ डिसेंबरपर्यंत लाभार्थी संख्येबाबत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ड्रॉप आऊट झालेल्या बालकांनाही लस देण्यात येणार आहे.

१० दिवसानंतर दिसतात लक्षणे
गोवर हा आजार विषाणूमुळे होणारा असंसर्गजन्य आजार आहे. गोवर आजाराची लक्षणे ७ ते १० दिवसात दिसून येतात. हा आजार लसीकरणामुळे टाळता येणारा आहे. त्यामुळे ९ महिने पूर्ण झालेल्या बालकांना पहिला डोस व १६ महिने पूर्ण झालेल्या बालकांना दुसरा डोस द्यावा.

गोवर आजराची लक्षणे
ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळ्यांची जळजळ, डोळे लाल होणे, चेहऱ्यावर लाल, सपाट पुरळ, अशक्तपणा, अंग दुखणे, तोंडाच्या आतील बाजूस पांढरे चट्टे दिसणे अशी गोवर आजाराची सामान्य लक्षणे आहेत.

लसीकरण करून घ्यावे
नगर शहरात गोवरचा एक रुग्ण आढळला होता. तो पूर्णपणे बरा झाला आहे. मनपाकडून व्यापक स्वरूपात गोवर लसीकरण अभियान राबविण्यात येत असून, नागरिकांनी बालकांना पहिला व दुसरा डोस द्यावा.''- डॉ. अनिल बोरगे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा.

गोवरमुळे होणारी गुंतागुत
अतिसार, मध्य कर्ण संसर्ग, न्युमोनिया, क्वचित फेफरे, अंधत्व किंवा मेंदू संसर्ग, कमी प्रतिकार शक्ती - विविध संसर्ग, कुपोषण दुष्टचक्र.

बातम्या आणखी आहेत...