आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:मंत्री गडाखांच्या प्रयत्नातून 30 कोटींचा निधी मंजूर; 5 गावांत जलसमृद्धीची गुढी, पाच गावांचा कायमस्वरूपी पाणीप्रश्न सुटणार

कुकाणे/ नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परिसरातील पाच खेडेगावांना कायमस्वरुपी नळपाणीपुरवठा योजनेद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असल्याने या खेड्यांत व तेथील वाड्यावस्त्यांवरील नागरिकांत सुखाचा मोहोर फुलल्याने समाधानाच्या गाठीतून यंदा पाडव्याला या खेड्यांनी जलसमृद्धीची गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करून आनंद व्यक्त केला.

नेवासे तालुक्यातील नांदूर शिकारी, पाथरवाले, सुलतानपूर, सुकळी खुर्द व सुकळी बुद्रूक या पाचही गावांची तहान आता मोठ्या प्रतीक्षेनंतर भागणार आहे. जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी पाणी योजनेसाठी तब्बल ३० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळवून दिल्याने या गावांत चैतन्य आहे. मुळा उजव्या कालव्यातून पाणी घेऊन ते साठवण तलावात टाकण्यात येईल. गावांतील १० हजार लोकसंख्येला प्रतिमाणसी ५५ लिटर्स दैनंदिन पाणी मिळेल. यंदाच्या गुढीध्वजास मंत्री गडाखांची छबीही आनंदाच्या भरात लावत ग्रामस्थांनी शुक्रवार सायंकाळपासूनच गुढी उभारली.

गावात आनंदोत्सव
उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी धावाधाव करावी लागे. तर पावसाळ्यात गढूळ पाणी पिण्याची वेळ येते. या योजनेमुळे गावांत, वस्त्यांनाही नळपाणीपुरवठा होणार असल्याने वर्षांनुवर्षांची पाणी योजनेची मागणी मंत्री शंकरराव गडाख यांच्या भगीरथ प्रयत्नातून साकारत असल्याने पाचही लाभार्थी गावांत आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.
विलास लिपणे, ग्रामस्थ, नांदूरशिकारी.

नांदूरशिकारी पाणी पुरवठा योजना सौरऊर्जेवर चालणार
पाणी योजना चालवण्यासाठी विजेची गरज मोठ्या प्रमाणावर लागत असते. त्यामुळे भरमसाठ वीजबिल भरताना योजनांच्या नाकीनऊ येत असते. वीजबिलावर पर्याय म्हणून ही योजना संपूर्णपणे सौर ऊर्जेवर केली जाणार असून सौर ऊर्जेवर चालणारी ही तालुक्यातील पहिलीच पाणी पुतवठा योजना असणार आहे.

या गावांचा पाणीप्रश्न मिटणार
गावे व लोकसंख्या : वडुले १६१४, पाथरवाला ३१८७, सुलतानपूर -१८२२, नांदूर शिकारी-१५३४, सुकळी बुद्रूक -११८६ व सुकळी खुर्द-४९९ सर्व पाच गावांची एकूण लोकसंख्या ९ हजार ८४३ आहे. या पाणी योजनेसाठी वरील सर्व गावांची सन २०५३ ची पुढील लोकसंख्या १६ हजार ग्रहीत धरून पाणी योजना साकारणार आहे.

साडेतीन एकरांवर जलशुद्धीकरण केंद्र
या पाणी योजनेसाठी नांदुरशिकारी येथे साडेतीन एकर जमिनीवर जलशुद्धीकरण केंद्र व उंच संतुलित पाण्याची टाकी बांधली जाणार आहे. तेथूनच या गावांसह लगतच्या गावांना पिण्याचे पाणी पुरवले जाणार आहे. त्यासाठी याच ठिकाणी पाणी साठवण तलाव केला जाणार असून ७० कोटी लिटर्सचा पाणीसाठा त्यात होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...