आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिसिंग प्रकरण:इंदूरच्या दीप्ती प्रियकरासोबत निघून गेल्याचे उघड, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दीपाली काळे यांची माहिती

शिर्डी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन वर्षांपूर्वी शिर्डीत साई दर्शनाला आल्या असताना झाल्या हाेत्या गायब, नंतर इंदूरला बहिणीच्या घरी सापडल्या

आपल्या पतीसह कुटुंबाच्या बरोबर साई दर्शनासाठी आलेली दीप्ती सोनी या मिसिंग प्रकरणाचा छडा अखेर पोलिसांनी लावला असून या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. दीप्ती सोनी ही महिला प्रियकरासोबत पळून गेल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक दीपाली काळे यांनी शिर्डीत पत्रकारांना दिली. संपूर्ण देशभर गाजलेल्या या प्रकरणाचे सत्य उघडकीस आले आहे.

इंदूर येथील साईभक्त मनोज सोनी कुटुंबीयांसह १० ऑगस्ट २०१७ रोजी शिर्डीत साई दर्शनासाठी आले होते. दीप्ती सोनी या खरेदी करण्यासाठी दुकानात गेल्या असता त्या गायब झाल्या होत्या. अनेक तपास करूनही आपली पत्नी दीप्ती न सापडल्याने मनोज सोनी यांनी शिर्डी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. बराच कालावधी लोटला तरी आपली पत्नी मिळत नसल्याने मनोज सोनी यांनी शिर्डीत हरवलेल्या व्यक्तींची माहितीच्या अधिकारात माहिती मिळवून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. या दरम्यान न्यायालयाने शिर्डी पोलिस व अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केलेल्या तपासाबाबत नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले तसेच मानवी तस्करी अथवा अवयव चोरीचे रॅकेट कार्यरत आहे का या दृष्टीने तपास करण्याचे निर्देश राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांना दिले होते. मात्र एकीकडे न्यायालयाच्या आदेशानुसार तपासाची चक्रे वेगाने फिरत असताना अचानक साडेतीन वर्षांपूर्वी गायब झालेल्या दीप्ती सोनी या गुरुवार दि. १७ डिसेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास इंदूर येथील बहिणीच्या घरी परतल्या. त्यानंतर तिचा पती तिला घेऊन शिर्डीला आला होता. त्यानंतर तिला पतीने शिर्डी पोलिस ठाण्यात आणले पोलिसांनी तिला औरंगाबाद उच्च न्यायालयात हजर केले.

तब्बल साडेतीन वर्षे ही महिला कोणाबरोबर होती, याचा तपास शिर्डी पोलिस स्टेशनचे तपास पथक करत होते. याबाबत सोनी यांची चौकशी केली असता मला शिर्डीत बाजारपेठेत खरेदी करत असताना चक्कर आली त्यानंतर मी खाली पडले मला त्यानंतर काही समजले नाही, मी इकडे कशी आली हे सांगता येणार नाही असे सांगितले. दरम्यान, या प्रकरणात वेगळेच काहीतरी दडले असल्याने सखोल तपास करत होते. अधिक तपासात एवढे दिवस कुठे होती, कुणाबरोबर गेली याची माहिती पोलिसांनी तिच्याकडून घेतली असता ती स्वतः शिर्डीतून कोपरगावला गेली होती. तेथून रेल्वेने पुण्याला गेली. पुण्यातून तिचा प्रियकर ओमप्रकाश चंदेल याला बोलावून घेतले व दोघे मध्य प्रदेशला निघून गेले. या मिसिंग प्रकरणाचा छडा लावण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, पाेलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे, सहायक पाेलिस निरीक्षक गंधाले व मिथुन घुगे, पोलिस उपनिरीक्षक दातिरे आदींसह तपास पथकातील सर्वांनी विशेष प्रयत्न केले. आमच्या दृष्टीने तपास पूर्ण झाला, असे अतिरिक्त पोलिस अधीक्षक काळे यांनी सांगितले.

स्मृतिभ्रम झाल्याचे नाटक करायला सांगितले

हनुमान गाथा सांगणाऱ्या चंदेल याच्याशी तिचे प्रेमसंबध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी चंदेलकडे वारंवार विचारणा सुरू केल्यावर आपण यात फसू असे त्याला वाटू लागले. मग चंदेलने दीप्तीला स्मृतिभ्रम झाल्याचे नाटक करण्यास सांगितले व तिला तिच्या बहिणीच्या गल्लीत आणून सोडले. ती बहिणीला भेटली व नंतर या प्रकरणातील सत्य बाहेर येऊन उलगडा झाल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक काळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...