आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीष्मप्रतिज्ञा फोल:आमदार डॉ. किरण लहामटे यांची भीष्मप्रतिज्ञा ठरली फोल

अकोलेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर तालुक्यातील पठारावरील जवळेबाभळेश्वर व इतर ११ गावांसाठीच्या पिंपळगावखांड प्रकल्पातून पिण्यास पाणी नेण्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या पिण्याच्या नळपाणी योजनेची ५५ कोटी ६४ लाख १७ हजार ८०८ रूपये खर्चाच्या बांधकामाची निविदा संगमनेर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून ६ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे जोपर्यंत पिंपळगावखांड प्रकल्पाशिवाय अन्य ठिकाणांहून पठारावरील सामुदायिक नळपाणी योजनेस पाणी उद्भव उपलब्ध होत नाही तोपर्यंत पठारावरील सामुदायिक योजनेच्या कामाचे सर्व कामकाज बंद राहील ही आमदार डॉ. किरण लहामटे यांच्याकडून करण्यात आलेली भीष्मप्रतिज्ञा फोल ठरली आहे.

जोपर्यंत पिंपळगावखांड प्रकल्पाशिवाय अन्य ठिकाणांहून जवळेबाभळेश्वर सामुदायिक योजनेस खात्रीलायक उद्भभाचा शोध मिळत नाही, तोपर्यंत पठारावरील योजनेचे टेंडरसह सर्व कामकाज ठप्प राहील, असे आश्वासन पिंपळगावखांड प्रकल्प लाभक्षेत्रातील गावांना दिल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यातच आमदार डॉ. लहामटे यांच्यासह अगस्ति साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, लोकनेते अशोक भांगरे आदींच्या आश्वासनाला तडे गेले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, संगमनेर कार्यालयामार्फत कार्यकारी अभियंत्याकडूून सोमवारीच शासकीय माहीती विभागामार्फत डीजीआयपीआर/२०२२/२०२३/सी१०२५ नुसार ई-गट निविदा सूचना क्र. १२, सन २०२२-२३ हे शासनाकडून टेंडर प्रक्रिया प्रसिद्धीस देण्यात आल्याने पिंपळगावखांड प्रकल्प लाभक्षेत्रातील गावांतील शेतकऱ्यांमधे पुन्हा चलबिचल सुरू झाली आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असतानाच अकोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व संगमनेरमधील राष्ट्रीय काँग्रेस पक्ष नेतृत्वात समन्वय दिसत नाही. कारण काही दिवसांपूर्वीच पिंपळगावखांड प्रकल्पातून पठारावरील योजनेस पिण्यास पाणी नेण्यास लाभक्षेत्रातील शेतकरी व गावकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन आमदार डॉ. लहामटे व इतर समविचारी नेत्यांनी संगमनेर येथे महसूल मंत्र्यांबरोबर बैठक घेतली. याचा हवाला देऊनच आमदार डॉ. लहामटे यांनी पिंपळगावखांड प्रकल्पातून पठारावरील सामुदायिक पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करण्यात येणार नाही, पण मी पठारावरील गावांनाही अतिरिक्त नवीन पाणी उपलब्ध करून पिण्यास देणारच अशी भीष्म प्रतिज्ञा केली. या टेंडर प्रसिद्ध संदर्भात मंगळवारी दुपारी पाच वाजता आमच्या प्रतिनिधीने संगमनेर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागास लॅन्डलाईन फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणीही फोन उचलण्याची तसदी घेतली नाही, यामुळे या कार्यालयाकडून अधिक माहिती मिळू शकली नाही. तर आमदार डॉ. लहामटे विधान परिषद निवडणुकीत व्यस्त असल्याने प्रतिक्रियेबद्दल त्यांचाही संपूर्ण होऊ शकला नाही.

बातम्या आणखी आहेत...