आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार डॉ. किरण लहामटे यांचा इशारा:म्हणाले - खासगी सावकारशाहीच्या विरोधातील लढा आता माझ्या अजेंड्यावर राहील

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

क्रांतिकारक मुरलीधर मास्तर नवले यांना अभिवादन करतानाच तालुक्यातील खाजगी सावकारशाहीच्या विरोधात माझा लढा राहील, जे कोणी यात गुंतले असतील त्यांनी आताच सुधारणा करून घ्यावी, सापडल्यास हयगय होणार नाही, असा इशाराच आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिला.

नवलेवाडीतील क्रांतिकारक मुरलीधर मास्तर नवले यांच्या 50 व्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी आयोजित कार्यक्रमात आमदार डॅा. लहामटे बोलत होते.

आमदार लहामटे म्हणाले, सावकाराकडून घेतलेले पैसे व्याजासह परत करता येईनात म्हणून काही तरूणांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागल्याची उदाहरणे ताजी आहेत. मुरलीधर मास्तर नवले यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. याकरिता अकोले तालुक्यातून खासगी सावकारांच्या जाचातून शेतकऱ्यांसह सर्वसामान्य इतर कोणाची यापुढे आत्महत्या होऊ नये म्हणून तालुक्याचा सेवक म्हणून मी लक्ष घालणार आहे.यापुढील काळात तालुक्यातील खासगी सावकार हा मुख्य विषय माझ्या अजेंड्यावर असेल.

आम्हाला अभिमान- मधुकर नवले

अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर नवले म्हणाले, समाजाने स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारकांचे विस्मरण होऊ देऊ नये. तसे झाल्यास ती त्यांच्या राष्ट्रप्रेम, त्याग व सामाजिक कार्याशी प्रतारणा ठरेल. स्वातंत्र्य चळवळीचा आवाज बुलंद करण्यात अकोले, संगमनेर तालुक्यातून अनेक क्रांतिकारक होते, त्यात नवलेवाडीतील बुवासाहेब नवले, मुरली मास्तर नवले या ढाण्या वाघासारखे अनेकजण होते. त्यांचा आम्हास अभिमान आहे.

यावेळी महाराष्ट्र विडी कामगार संघटनेचे अध्यक्ष कारभारी उगले, प्रा. सोपानराव तथा एक. झेड. देशमुख, माकपचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी मनोगत व्यक्त केले.

चळवळी जिवंत ठेवाव्या लागतील- भांगरे

अगस्ती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक भांगरे म्हणाले, आपला तालुक्याचा पाण्याचा वाटा, दूध दर व न्यायपूर्ण हक्कांबाबत यापुढेही आपल्याला चळवळी जिवंत ठेवाव्या लागतील.

वडिलांचा सहवास 14 वर्षेच - रवींद्र नवले

मुरलीधर मास्तर नवले यांचे चिरंजीव सिने कलाकार रवींद्र नवले म्हणाले, क्रांतिकारक व त्यांच्या इतिहासाबद्दल सर्वजण बोलले, पण वडिलांचा सहवास मला फक्त 14 वर्ष लाभला. शाहीर अमर शेख हे माझ्या वडिलांचे जीवलग मित्र होते, ते माझ्यावर खूप प्रेम करत. दोघेही स्वातंत्र्य संग्रामाची गीते कलापथकातून गात परिवर्तन घडवून आणण्यासाठी संघर्ष करीत.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा बँकेचे संचालक मधुकर नवले, मातोश्री मंदाबाई मुरलीधर नवले, प्रा. एस. झेड. देशमुख, माकपचे राज्य सरचिटणीस डाॅ. अजित नवले, अ‌ॅड वसंत मनकर, अ‌ॅड. गोपाळराव गुळवे, अशोक भांगरे, भाकपचे नेते कारभारी उगले, ग्रामसुरक्षा यंत्रणेचे प्रणेते डी. के. गोर्डे, अगस्ती कारखान्याचे संचालक अशोक देशमुख, मीनानाथ पांडे, विक्रम नवले, मच्छिंद्र धुमाळ, प्रदीप हासे, विकास शेटे, महेश नवले, भाजपचे गिरजाजी जाधव, रमेश जगताप आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन निवृत्त प्रा. विलास नवले यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...