आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:महागाई वाढवून भाजपने पुन्हा चूल पेटवण्याची वेळ आणली, महागाई विरोधात श्रीरामपुरात आमदार कानडे यांचे आंदोलन

श्रीरामपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रातील भाजपचे सरकार हे शेतकरी, सर्वसामान्य व गरीब जनतेला वेठीस धरून त्यांच्या खिशातील पैसा ओरबाडून आपले मित्र असलेल्या बड्या उद्योगपतींचे हित साधत आहेत. गोरगरीब महिलांसाठी असलेल्या मोफत उज्वला गॅस योजनेचा बोजवारा उडाला असून गॅस सिलींडरचे भाव प्रचंड प्रमाणात वाढल्याने गोरगरिबांना गॅस भरणे शक्य नाही. त्यामुळे गोरगरीब महिलांना पुन्हा चुल पेटविण्याची दुर्देवी वेळ भाजपा सरकारने आणलेली आहे, असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले.

केंद्राच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे महागाई गगनाला भिडल्याचा आरोप करीत आमदार लहू कानडे यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महागाई मुक्त भारत अभियानांअंतर्गत श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस पक्षाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या लाँग मार्च प्रसंगी ते बोलत होते. यावेळी इंद्रनाथ थोरात, अरुण नाईक, अंजुम शेख, ज्ञानेश्वर मुरकुटे, बाळासाहेब चव्हाण, रवींद्र गुलाटी, अंकुश कानडे, अशोक कानडे, अशोक बागुल, सुभाष तोरणे, किशोर बकाल, प्रताप देवरे, अॅड. समीन बागवान, अप्सरा शेख, राजेश अलघ, सतीश बोर्डे, किशोर बकाल, विष्णुपंत खंडागळे उपस्थित होते.

कानडे म्हणाले, केंद्रातील भाजपप्रणित मोदी सरकार हे भांडवल धार्जिने सरकार असून शेतकरी सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हिताचे निर्णय न घेता आपला मित्र असलेल्या उद्योगपतींच्या व बड्या भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेत असल्याने देशातील शेतकरी गोरगरीब जनता महागाईने त्रस्त झालेली आहे. जीवनाश्यक वस्तू, गॅस, पेट्रोल, डिझेलचे भाव मोदी सरकारच्या ७ वर्षांच्या काळात प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. जीवनाश्यक वस्तू तेलाने शंभरी पार केलेली आहे. देशात महागार्इने उच्चांक गाठला असून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला जीवन जगणे असह्य झालेले आहे. त्याचप्रमाणे रात्रंदिवस काबाड कष्ट करून शेती पिकविणारा शेतकरी खते, औषधे, बियाणे यांचे भाव देखील प्रचंड प्रमाणात वाढल्याने त्रस्त झालेला आहे. कर्जबाजारीपणा, दुष्काळ, अवकाळी पाऊस यामुळे हजारो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या शेतकऱ्यांचा व गोरगरीब जनतेचा विसर भाजपा प्रणित मोदी सरकारला पडला असल्याचे त्यांनी सांगितले.

उज्वला गॅस योजनेचा बोजवारा, घरगुती गॅसचे भाव भिडले गगनाला
ससाणे गटाच्या समर्थकांची आंदोलनात अनुपस्थिती

मागील काही काळापासून ससाणे गट व आमदार कानडे गटात दरी वाढत आहे. गेल्या अनेक कार्यक्रमात ससाणे गट सहभागी होतांना दिसत नाही. या आंदोलनातही ससाणे गटाचे कोणीही समर्थक सहभागी झाले नव्हते. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही गटात वाढत चाललेली दरी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

उद्योगपती तुपाशी, शेतकरी उपाशी
काँग्रेसच्या ७० वर्षांच्या काळात जेवढी भाववाढ झालेली नाही, त्यापेक्षा कितीतरी पटीने भाजप सरकारने ७ वर्षांच्या काळात भाववाढ केलेली आहे. केंद्रातील मोदी सरकारने गेल्या काही वर्षात अंबानी, अदानी, विजय मल्ल्या यांच्यासह सुमारे ७ हजार उद्योगपतींना सुमारे २१ लाख कोटींचे कर्ज माफ केले आहे. परंतु गोरगरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीजमाफी तसेच गोरगरीब जनतेच्या योजनांना पैसा नाही हे दुर्दैव असल्याचे आमदार लहू कानडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...