आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर -पाथर्डी -नांदेड निर्मळ, नगर- राहुरी-कोल्हार-शिर्डी- कोपरगाव, नगर- मिरजगाव -चापडगाव- करमाळा -भुणी, नगर- पाथर्डी- शेवगाव या राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती तातडीने करावी या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी बुधवारी (७ डिसेंबर) ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. यावेळी महामार्गांच्या दुरुस्तीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. उपोषणाला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह सामाजिक संघटनांनी सहभाग घेऊन पाठिंबा दिला. महामार्गांची तातडीने दुरुस्ती करावी या मागणीसाठी मंगळवारी आमदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना भेटून उपोषण करण्याचा इशारा दिला होता. बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार लंके यांनी उपोषण सुरू केले आहे.
उपोषणात माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, ज्येष्ठ नेते दादा कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी सभापती बाळासाहेब हराळ, विक्रम राठोड, काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे, क्षितिज घुले, घनश्याम शेलार, जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे,सामाजिक कार्यकर्ते शाम असावा, अनिल ढोकणे, किसन आव्हाड, चांद मणियार, बंडु बोरुडे, हरिहर गर्जे, सुरेश लगड, बाबासाहेब भिटे, सचिन गवारे, धनराज गाडे, किसन चव्हाण, रेणुका पुंड, सतीश पालवे, बा. ठ. झावरे, रा. या. औटी, जितेश सरडे, सतीश भालेकर, अनिल गंधाक्ते, सरपंच सचिन पठारे, सचिन साठे, संदीप मगर, सचिन काळे, किशोर थोरात, संतोष तरटे, अक्षय थोरात, कारभारी पोटघन, बाळासाहेब खिलारी, सुधीर लाकूडझोडे आदी सहभागी झाले होते.
या उपोषणाला काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेसह विविध संघटनांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शाम असावा म्हणाले, लोकप्रतिनिधी आहेत की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यांची अवस्था कठीण झाल्याने लोक त्रस्त झाले आहेत. नेते हेलिकॉप्टरने येतात पण सर्वसामान्यांचे काय असा सहभाग त्यांनी केला.
उपोषणावर ठाम : आमदार लंके
प्रशासनाकडून मोघम स्वरूपाची कारणे देण्यात आली आहेत. मागील २ ते ३ वर्षांपासून पाठपुरवा करून देखील संबंधित अधिकारी यांच्याकडून योग्य ती कार्यवाही केली गेली नाही. प्रशासन जोपर्यंत काम सुरू करत नाही तोपर्यंत उपोषणावरच ठामच आहोत असे आमदार लंके यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांची उपोषणाकडे पाठ
उपोषणस्थळी आमदार निलेश लंके भजन करत असताना रात्री ८.४४ वाजता जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले कार्यालयातून बाहेर पडले. आपल्या शासकीय वाहनाने बाहेर पडत डॉ.भोसले यांनी उपोषणाकडे पाठ फिरवली.
विखे विरुद्ध लंके संघर्ष
आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण मतदारसंघातून आमदार लंके हे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार मानले जातात. यातूनच खासदार सुजय विखे विरुद्ध लंके असा संघर्ष पेटला आहे. गौण खनिज मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, निलेश लंके व संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी भोसले यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.
लंके यांनी उपोषण मागे घ्यावे
महामार्गांच्या प्रश्नाबाबत आमदार निलेश लंके यांना वस्तुस्थिती सांगितलेली आहे. बुधवारी संबंधित विभागाचे अभियंता व काही अधिकारी आले होते. त्यांनी देखील वस्तुस्थिती सांगितली आहे. उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली असून, कामे सुरू झाली आहेत. आठ दिवसात या कामांना गती मिळेल त्यामुळे त्यांनी उपोषण सोडावे असे प्रशासनाचे आवाहन आहे. असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी रात्री दिव्य मराठीशी बोलताना स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.