आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवंश गोपालक उन्नती अभियान:मोबाईल व्हेटरनिटी क्लिनिक सुरु करुन गोपालकांना चांगली सेवा देणार - आशिष येरेकर

अहमदनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात सुमारे 16 लाख गोवंश असून, आगामी काळात मोबाईल व्हेटरनिटी क्लिनिक (फिरता जनावरांचा दवाखाना) जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय चांगल्या प्रजातींचे जतन व संवर्धनही करण्यात येईल. गोवंश गोपालक उन्नती अभियानातून पशुधन विकास अधिकारी, पर्यवेक्षकांनी गोपालकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले.

जिल्हा परिषदेच्यावतीने गोवंश गोपालक उन्नती अभियान हाती घेण्यात आले आहे. याअंतर्गत पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक यांच्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. जि. प. मुख्यालयातील सभागृहात झालेल्या या चर्चासत्राचे उद्घाटन मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.

जिल्ह्यात आरोग्य व शिक्षणविभागासोबत पशुसंवर्धन विभागावर अधिक लक्ष केंद्रीत करणार आहे. नगर जिल्हा दुग्ध उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा आहे. जवळपास 16 लाख गोवंश जनावरे जिल्ह्यात आहेत. एकट्या संगमनेर तालुक्याचे दुध उत्पादन हे पूर्ण विदर्भातील दुध उत्पादनाइतके आहे. त्यामुळे दूध उत्पादक, पशुपालकांना शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळाला पाहिजे. नगर जिल्हा परिषदेच्यावतीने गोवंश गोपालक उन्नती अभियान हाती घेण्यात आले आहे.

दरम्यान, कार्यक्रमात 2021-2022 मध्ये पशुधन विकासात उत्कृष्ट तांत्रिक कामकाज करणार्‍या पाथर्डी, राहुरी व राहाता या तीन तालुक्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

दुध उत्पादन वाढीसाठी अभियान

गोवंश, गोपालक अभियानाचा उद्देश जिल्ह्यातील दुग्ध उत्पादन वाढवून शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती साधायचा आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 216 व राज्य शासनाच्या 7 पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत सेवा दिली जाते. आज जिल्ह्यात विक्रमी दूध उत्पादन होत असले तरी शेतकरी दुध धंद्यातून होणार्‍या आर्थिक कमाईबाबत समाधानी नाही. त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवायचे तर दूध उत्पादन वाढले पाहिजे. यासाठी पशुसंवर्धन विभाग या अभियानात काम करणार आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संजय कुमकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...