आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधायक:आधुनिक गाडगेबाबांची राज्यभर स्वच्छता वारी, डोंगरगाव येथील हरिभाऊ उगले यांचा वसा, परिसर स्वच्छतेसह लोकांच्या मनाचीही करताहेत स्वच्छता

पिंपरणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. त्यातीलच एक असलेले राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी अध्यात्माबरोबर स्वच्छतेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन केले. आजही त्यांच्या विचारांचा अंगीकार करून प्रत्यक्षात आचरण करणारे लोक तयार झाले आहेत. असेच डोंगरगाव (ता. अकोले) येथील हरिभाऊ उगले आधुनिक गाडगेबाबा म्हणून नावारुपाला आले असून संपूर्ण राज्यभर भटकंती करून परिसर स्वच्छतेसह लोकांच्या मनाचीही स्वच्छता करत आहे.

संत गाडगेबाबा यांच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वखर्चातून हरिभाऊ उगले पर्यावरण आणि आरोग्य वाचवण्यासाठी काम करत आहे. गेल्या वर्षभरापासून हे सेवेचे व्रत अंगीकारत स्वतःचे गाव असलेल्या डोंगरगावमधून कामाचा श्रीगणेशा केला. प्रारंभी गावातील सार्वजनिक मुतारी, शौचालय व शाळा परिसर स्वच्छ केला. त्यावेळी नागरिकांना काही सूचेनाच. अचानक कसे काय हे काम करू लागले. अनेकांनी टिंगलटवाळी देखील केली. तरी देखील आपल्या कामाशी आणि निष्ठेशी एकरुप व प्रामाणिक राहून त्यांची सेवेचे व्रत सुरूच ठेवले.

विशेष म्हणजे कडक टाळेबंदीतही त्यांनी डोंगरगाव ते पंढरपूर दुचाकीवरून प्रवास करत स्वच्छता अभियान राबवले. यावेळी त्यांना प्रशासनाने देखील मदत केल्याचे ते आवर्जुन सांगतात. नुकतीच त्यांची स्वच्छतेची वारी मूळ अकोले तालुक्यात आली असून, चार दिवसांपूर्वी आंबडमध्ये पोहोचली होती. तेथे त्यांनी शाळा स्वच्छ करून ग्रामस्थांनाही यामध्ये सहभागी करून गाव स्वच्छ केले.

शासन स्तरावरून देखील स्वच्छतेसाठी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व माझी वसुंधरा अभियान राबवण्यात येत आहे. तरी देखील अद्यापही स्वच्छतेबाबत केवळ नागरिकच नाही, तर शासन व्यवस्थेतील घटकही उदासीन असल्याचे वारंवार दिसून येते. याचा पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होत आहे. यातूनच जागतिक तापमान वाढीचे व अत्यल्प पर्जन्याचे संकट निर्माण होत आहे. त्यासाठीच वेळीच सावध होऊन पर्यावरण वाचवण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न करावे, असे आवाहन आधुनिक गाडगेबाबा हरिभाऊ उगले करत आहे.

आतापर्यंत ३६ जिल्ह्यांत भ्रमंती करून जनजागृती
डोंगरगाव येथील हरिभाऊ उगले यांनी संत गाडगेबाबांसारखेच साहित्य गोळा करून दुचाकीच्या मदतीने राज्याची भ्रमंती केली. आतापर्यंत ३६ जिल्ह्यांचा प्रवास केला आहे. त्या-त्या जिल्ह्यांतील गावागावांत जावून स्वच्छतेबरोबर नागरिकांचे प्रबोधन केले. झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, पर्यावरण वाचवा असे संदेशही दिले आणि विविध उदाहरणांद्वारे पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासह आरोग्य जपण्याचे कळकळीचे आवाहन करत आहे.

बातम्या आणखी आहेत...