आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Modi Government's Housing Scheme In The City 'Gharghar'; With The Exception Of Sanjaynagar, All The Projects Have Been On Paper For The Last Four Years | Marathi News

घरकुल:मोदी सरकारच्या आवास योजनेला शहरात ‘घरघर’; संजयनगर वगळता चार वर्षांपासून सर्व प्रकल्प कागदावरच, 840 घरकुलांसाठी केवळ 45 लाभार्थ्यांकडूनच नोंदणी

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नगर शहरात मंजूर असलेल्या घरकूल प्रकल्पांपैकी संजयनगर वगळता इतर सर्व प्रकल्प चार वर्षांपासून कागदावरच आहेत. केडगाव व नालेगाव येथील घरकुलांसाठी ४५ लाभार्थ्यांनी अनामत रक्कम भरली होती. मात्र, त्यातील २४ जणांनी मनपाकडून अनामत रकमा परत घेतल्या आहेत. या मोदी सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला लाभार्थ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याने निविदा मंजुरीनंतरही प्रकल्प उभारणीचे काम ठप्पच आहे.

नगर शहरात मनपाकडे दाखल १७ हजार अर्जांपैकी ११ हजार ३२३ लाभार्थी पात्र ठरले होते. सन २०१८ मध्ये केडगाव येथे ६२४ व नालेगाव येथे २१६ अशा ८४० घरकुलांचा प्रकल्प मंजूर झाला होता. तसेच झोपडपट्टी पुनवर्सन घटकांतर्गत संजयनगर येथे २९८ घरांचा प्रकल्प मंजूर आहे. सन २०१९ मध्ये आगरकर मळा येथे ५९४ घरांचा आणखी एक प्रकल्प मंजूर झाला आहे. केडगाव व नालेगाव प्रकल्पासाठी पात्र लाभार्थ्यांची सोडत काढून ८४० लाभार्थी निश्चित झाले. या प्रकल्पाची निविदा प्रक्रियाही झाली आहे. मात्र, या दोन्ही घरकुलांसाठी केवळ ४५ लाभार्थ्यांनीच अनामत रकमा भरल्या होत्या. त्यातील २४ जणांनी रकमा परत नेल्या आहेत. सर्वसामान्यांसह मध्यमवर्गीय नागरिकांनी पाठ फिरविल्यामुळे हे दोन्ही प्रकल्प चार वर्षांनंतरही कागदावरच आहेत. संजयनगर येथे २९८ पैकी ३३ घरकुलांचे काम पहिल्या टप्प्यात झाले आहे. आगरकर मळा येथील प्रकल्पासाठी निविदा प्रक्रियाही झालेली नाही. प्रकल्प किंमत, सदनिकांची जागा व अनामत रक्कम भरण्यास दर्शविण्यात आलेली असमर्थता यामुळे शहरात या योजनेला प्रतिसाद मिळालेला नाही.

२४ लाभार्थ्यांनी अनामत रकमा मनपाकडून घेतल्या परत

पंतप्रधान आवास योजना दृष्टिक्षेपात
45 लाभार्थ्यांनी घरकुलासाठी भरली अनामत रक्कम
02प्रकल्पांच्या निवदा मंजुरीनंतरही उभारणीचे काम ठप्पच
298घरांचा प्रकल्प संजयनगर येथे मंजूर
594घरांचा आणखी एक प्रकल्प आगरकर मळा येथे मंजूर
33 घरकुलांचे काम पहिल्या टप्प्यात पूर्ण
265 घरकुलांचे काम प्रगतीपथावर

लाभार्थ्यांकडून प्रतिसाद नाही
मनपाकडून केडगाव व नालेगाव येथील प्रकल्पासाठी निविदा मंजूर केली आहे. ४५ जणांनी अनामत रकमाही भरल्या होत्या. लाभार्थ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याने काही जणांनी अनामत रकमा पर घेतल्या आहेत. योजनेच्या मार्केटिंगसाठी एजन्सी नियुक्तीचा प्रस्ताव करण्यात आला आहे.'' गणेश गाडळकर, प्रकल्प अभियंता, मनपा.

मार्केटिंग एजन्सीचा प्रस्ताव लालफितीत
महापालिकेने या योजनेसाठी मार्केटिंग एजन्सी नियुक्त करण्याचा प्रस्ताव केला होता. लाभार्थ्यांपर्यंत माहिती पोहचवणे, त्यांची अर्ज प्रक्रिया, अर्थ सहाय्यासाठी मदत करणे आदी कामे या संस्थेकडून केली जाणार होती. मात्र, मागील वर्षभरापासून या एजन्सी नियुक्तीचा प्रस्ताव लालफितीतच अडकला आहे.

८४० घरकुलांसाठी केवळ ४५ लाभार्थ्यांकडूनच नोंदणी
केडगाव येथे ६२४ सदनिकांचा प्रकल्प मंजूर
नालेगाव येथे २१६ सदनिकांचा प्रकल्प मंजूर
११ हजार ३२३ लाभार्थी ठरले होते पात्र

मध्यमवर्गीयांनी का फिरवली पाठ?
योजनेत केवळ ३०० चौरस फुटांचेच घरकुल (सदनिका) मिळणार असल्याने मध्यमवर्गीयांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यातही घराची किंमत ९ ते १० लाख रुपये आहे. या किंमतीत केडगाव, बोल्हेगावसारख्या उपनगर परिसरात घरकुले मिळत असल्याने या योजनेकडे मध्यवर्गीय पाठ फिरवत आहेत.

अनामत का भरत नाही?
या योजनेत बहुतांशी लाभार्थी हे सर्वसामान्य आहेत. यातील काही झोपडपट्टीत राहणारे, तर बहुतांशी हातावर पोट भरणारे सामान्य नागरिक आहेत. या नागरिकांसमोर १ लाख रुपयांची अनामत रक्कम भरायची कोठून असा प्रश्‍न आहे.

धोरणात्मक निर्णय हवा!
मध्यमवर्गीयांना या प्रकल्पाकडे आकर्षित करण्यासाठी ३०० चौरस फुटांऐवजी किमान ५०० चौरस फुटांपर्यंत जागा असणे आवश्यक आहे. तसेच, सामान्या बँकांकडून कर्ज मिळत नसल्याने त्यांच्यासाठी शासनाने वित्तीय महामंडळामार्फत कर्ज सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडून धोरणात्मक निर्णय होणे अपेक्षित आहे.

बातम्या आणखी आहेत...