आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार अमोल कोल्हे राष्ट्रवादीत नाराज?:शिर्डीतील मंथन शिबिराकडे फिरवली पाठ, सर्व प्रमुख नेत्यांचेही मौन

अहमदनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजारी असतानासुद्धा 'राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा' शिबिरासाठी शिर्डीत हजेरी लावली. पण, या शिबिराकडे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी पाठ फिरवली असल्याचे समोर आले आहे.

शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय मंथन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते हजर आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते समजले जाणारे अमोल कोल्हे यांनी मंथन शिबिराकडे पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार डॉ. अमोल कोल्हे हे मंथन शिबिरात 'हिंदुत्व आणि शिवाजी महाराजांची कार्यपद्धती', या विषयावर बोलणार होते. मात्र, वेळेअभावी त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी होती. तसेच, पक्षाच्या कार्यपद्धतीवरही कोल्हे नाराज असल्याची माहिती आहे. त्यामुळे कोल्हे यांनी या शिबिराकडे पाठ फिरवल्याचे सांगितले जात आहे.

अजित पवारांचीही चर्चा

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारही शिबिराच्या शेवटच्या दिवशी फारसे सक्रीय नव्हते. अचानक ते आपल्य आजोळी निघून गेले, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. जयंत पाटील यांच्या भाषणाच्यावेळीही अजित पवार गैरहजर होते, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही पक्षाच्या अधिवेशनात जयंत पाटील यांचे भाषण सुरू असतानाच अजित पवार सभागृहाबाहेर पडल्याने वाद निर्माण झाला होता. मात्र, तेव्हा आपण वॉशरूमला गेल्याचे स्पष्टीकरम अजित पवारांनी दिले होते. शिर्डीतील अजित पवारांच्या गैरहजेरीच्या चर्चेबाबत त्यांची प्रतिक्रिया अद्याप मिळू शकली नाही.

आजारी पवारांची हजेरी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजारी असतानासुद्धा 'राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा' शिबिरासाठी शिर्डीत हजेरी लावली. शिबिरासाठी शरद पवार यांनी सभागृहात प्रवेश केला तेव्हा 'देश नेता कैसा हो.. शरद पवार साहेब जैसा हो..' या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी शरद पवार फक्त चार ते पाच मिनिटे बोलले. पवार यांनी आज आपलं भाषण उभे न राहता बसूनच केले. त्यांच्या हाताला बँडेज लावलेले दिसत होते. त्यांचे उर्वरित भाषण दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखवले.

बातम्या आणखी आहेत...