आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांद्याच्या पडलेल्या दराकडे सत्ताधारी ढुुंकून पाहत नाहीत:खासदार शरद पवार यांची नगरमध्ये भाजपवर टीका

पारनेर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कांद्याचे भाव वाढल्यावर संसदेत व रस्त्यावर गोंधळ करणारे भाव पडल्यावर कांद्याकडे ढुुंकूनही पहायला तयार नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली. कांदा, ऊस तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर संसदेच्या अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे ते म्हणाले. आमदार लंकेे सर्वसामान्यांच्या हिताची जपणूक करणारा कार्यकर्ता असल्याचे गौरवोद्गार खासदार पवार यांनी काढले.

आमदार नीलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त निघोज येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या अभीष्टचिंतन सोहळ्यात पवार बोलत होते. निघोज ग्रामीण पतसंस्थेचा रौप्यमहोत्सव, संस्थेचे बाबासाहेब कवाद नामकरण, आमदार लंके यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना सात हजार सायकलींचे वाटप, स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे उद्घाटन खासदार पवार यांच्या हस्ते झाले. खासदार पवार म्हणाले, देशातील शेती, शेतीवर आधारित अर्थव्यवस्था संकटाच्या काळातून जात आहे. मी राज्याच्या काही भागात जाऊन आलो. महाराष्ट्रात ऊस हे महत्त्वाचे पीक आहे. उसाचे वजन कमी येत आहे. भावाची खात्री नाही. तीन दिवसांनी लोकसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. दिल्लीला गेल्यानंतर कांदा, ऊस तसेच शेतकऱ्यांचे अन्य प्रश्‍न यांची मांडणी संसदेत मांंडण्याची कामगिरी मी आणि माझ्या सहकाऱ्यांकडून केली जाईल. कांदा हे जिरायत शेतकऱ्यांचे पीक आहे. माझ्याकडे देशाच्या कृषी खात्याचे काम होते, त्या वेळी आम्ही मोठ्या प्रमाणावर कांद्याची निर्यात केली. दिल्लीत कांद्याचे भाव वाढले. संसदेत भाजपचे खासदार कांद्याच्या माळा घालून निषेध करू लागले. मात्र, शेतकरी वर्गाला कधीतरी दोन पैसे मिळाले, तर माळा घालून निषेध करण्याचे नाटक कशासाठी, असा प्रश्‍न आपण उपस्थित केला. कांद्याचे भाव वाढले म्हणून गोंधळ करणारे आज मात्र कांद्याचे दर पडले त्या वेळी त्याकडे ढुंकूनही पाहण्यास तयार नसल्याची टीका पवार यांनी केली. अशोक सावंत यांनी प्रास्ताविक केले.

आमदार लंकेंकडून सामान्यांच्या हिताची कामे
पारनेरचे नाव देशभर पोहोचले
एकेकाळी दुष्काळासाठी पारनेरचे नाव होते. कोरोनामध्ये लोकांना वाचवण्यासाठी संपूर्ण देशात कोठे काम झाले, तर ते पारनेर तालुक्यात. त्यासाठी या तालुक्याचे नाव घेतले जात आहे. याचे शंभर टक्के श्रेय जसे तुम्हाला आहे, तसे नेतृत्व करणाऱ्या नीलेश लंके यांना असल्याचे गौरवोद्गार पवार यांनी काढले.

आत्महत्या करायची का?
एक एकर कांद्यासाठी ७० हजार रुपये खर्च येतो. एक किलो कांदा पिकवण्यासाठी ८ ते १० रुपयांचा खर्च येत असताना ३ ते ४ रुपये भाव झाल्यावर शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची का, संसार कसा चालेल, कर्ज कसे फेडायचे, असा सवाल करत केंद्र तसेच राज्य सरकारला आग्रही भूमिका घ्यायला लावू, असे पवार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...