आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतशिवार:जिल्ह्यासाठी मृग बहार हवामान आधारित फळपीक विमा योजना; शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी व्हावे

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक योजना मृगबहार २०२२-२३ राबवण्यात येत आहे. या योजनेत पेरू, चिकू, संत्रा, मोसंबी, डाळिंब, लिंबू, आंबा, काजू व सीताफळ या फळबागधारक शेतकऱ्यांना आपल्या बागेचा विमा उतरवता येणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यात सुमारे ७६ हजार हेक्टरवर विविध फळबागा आहेत. कमी पाऊस, पावसाचा खंड, जास्त तापमान, जास्त पाऊस, आद्रता व किमान तापमान आदी विविध कारणामुळे फळबागांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे या विविध फळबागांना विम्याचे कवच देणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृगबहार राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत केंद्र शासनाने तीस टक्के विमा हप्ता स्वीकारला. अतिरिक्त ५ टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्वीकारले. उर्वरित ३५ टक्केवरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी प्रत्येकी ५०-५० टक्के प्रमाणे भरावयाचा आहे. यामध्ये एका शेतकऱ्यास चार हेक्टरपर्यंत विमा नोंदणी करता येईल. केवळ उत्पादनक्षम फळबागांना विम्याचे संरक्षण लागू राहणार आहे.

डाळिंब पिकासाठी प्रतिहेक्टरी विमा संरक्षित रक्कम १ लाख ३० हजार रुपये असून शेतकऱ्यांना भरावयाचा विमा हप्ता ६५०० रुपये आहे. पीक विमा भरण्याची अंतिम मुदत १४ जुलै २०२२ आहे. मोसंबीसाठी विमा संरक्षण ८० हजार रुपये, शेतकऱ्यांना विमा हप्ता ४ हजार रुपये, तर विमा भरण्याची मुदत ३० जून २०२२ आहे.\nपेरू पिकासाठी संरक्षित रक्कम ६० हजार रुपये, विमा हप्ता ३ हजार रुपये, हप्ता भरण्याची अंतिम तारीख १४ जून २०२२ आहे. संत्रा पिकासाठी विमा संरक्षण ८० हजार रुपये, विमा हप्ता ४ हजार रुपये, तर विमा भरण्याची अंतिम मुदत १४ जून २०२२ आहे.

चिकू पिकासाठी विम्याचे कवच ६० हजार रुपये, विमा हप्ता रक्कम ३ हजार रुपये, तर हप्ता भरण्याची अंतिम तारीख ३० जून २०२२ आहे.लिंबू पिकासाठी विमा संरक्षण ७० हजार रुपये, विमा हप्ता ३५०० रुपये, तर विमा भरण्याची अंतिम तारीख १४ जून २०२२ आहे. सीताफळ पिकासाठी प्रतिहेक्‍टरी विमा संरक्षण ५५ हजार रुपये, विमा हप्ता २७५० रुपये, तर विमा भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२२ आहे.

शेतकऱ्यांनी फळबागांना विम्याचे संरक्षण द्यावे
मृगबहार फळ पीक विमा योजनेसाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही कंपनी नियुक्त आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या फळबागांचा विमा उतरून आपल्या बागांना विम्याचे संरक्षण द्यावे. त्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी अथवा आपल्या गावातील कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्यासह नजीकच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...