आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानायलॉन चायना मांजावर बंदी असताना, शहरात त्याची सर्रास विक्री होत आहे. या चायना मांजामुळे मनपा अधिकाऱ्यांसह अनेक नागरिकांना दुखापत झाली. त्यामुळे महापालिकेने पथके नियुक्त करून छापेमारी सुरू केली. मात्र, महापालिकेला अद्याप एकाही ठिकाणी चायना मांजा सापडलेला नाही. दुसरीकडे पोलिसांना मात्र मागील दोन-तीन दिवसांपासून रोजच चायना मांजा आढळून येत आहे. स्थानिक गुन्हे शाखा व कोतवाली पोलिसांकडून आतापर्यंत चार कारवाया करण्यात आल्या. चायना मांजामुळे दुचाकीस्वार जखमी होण्याचे प्रकार वाढले आहेत.
खुद्द महापालिका अधिकाऱ्यांनाही या मांजामुळे दुखापत झाली आहे. काही नागरिकांच्या गळ्याला, तर काहींच्या हाताला दुखापती झाल्या आहेत. मांजापासून स्वत:ला वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात होऊन काही जण जखमी होत आहेत. त्यामुळे आयुक्त पंकज जावळे यांनी पथके नियुक्त करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
मनपाच्या पथकांनी अनेक दुकानांमध्ये तपासणी केली. मात्र, त्यांना चायना मांजा सापडला नाही. दुसरीकडे पोलिस प्रशासन मात्र चायना मांजाच्या विक्रीवर कारवाई करण्यासाठी आक्रमक झाले आहेत. दोन दिवसात स्थानिक गुन्हे शाखा व कोतवाली पोलिसांनी चार ठिकाणी कारवाया करीत मांजा जप्त केला. पोलिसांना चायना मांजा आढळून येत असताना व त्याची सर्रास विक्री होत असताना, मनपा पथकांना का सापडत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
कोतवाली पोलिसांची माळीवाडा व केडगावात कारवाई
एलसीबीने आधी माळीवाड्यात कारवाई केली. त्यानंतर जुन्या नगर तालुका पोलिस ठाण्याजवळ चेतन पतंग सेंटरमध्ये कारवाई केली. यात २४ हजारांचा मांजा आढळून आला. या प्रकरणी चेतन कन्हैय्या चिपोले (रा. हमालवाडा) याच्यावर गुन्हा दाखल झाला. कोतवाली पोलिसांनी केडगाव व माळीवाड्यात कारवाई केली. या प्रकरणी शंतनू राजेश शिंदे (वय १९, केडगाव), चेतन चंद्रकांत जंगम (वय २५, माळीवाडा) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मांजा वापरणाऱ्यांवरही कारवाई व्हावी
चायना मांजावर बंदी असली, तरी त्याची मागणी घटलेली नाही. लहान मुले व युवकांकडून चढ्या भावाने चायना मांजाची खरेदी केली जात आहे. मागणी असल्याने विक्रेतेही छुप्या मार्गाने विक्री करत आहेत. पोलिसांकडून विक्रेत्यांवर कारवाई केली जात असली, तरी वापर करणाऱ्यांवर मात्र कोणतीही कारवाई होत नाही. या मांजामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करून वापर करणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी होत आहे.
‘एलसीबी’सह पोलिस ठाणी ॲक्शन मोडवर!
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सलग दोन दिवस कारवाई केली. माळीवाडा व जुन्या तालुका पोलिस ठाण्याजवळ त्यांना चायना आढळून आला. कोतवाली पोलिसांकडूनही दोन कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून चायना मांजा जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सर्व पोलिस ठाण्यांना चायना मांजावर कारवाईचे आदेश दिले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.