आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा घोटाळा:महानगरपालिका म्हणतेय, संस्थेची आर्थिक फसवणूक झालीच नाही! ; घनकचरा व्यवस्थापन विभागाचा दावा

नगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या कचरा संकलन व वाहतुकीच्या बिलामध्ये वाढीव बिले सादर करून स्वयंभू ट्रान्सपोर्टने फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, महापालिका प्रशासन व स्वयंभु ट्रान्सपोर्टने हा आरोप फेटाळून लावला आहे. महापालिकेची कोणतीही फसवणूक झाली नाही, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे. तर कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे स्वयंभू ट्रान्सपोर्टने म्हटले आहे.

नोव्हेंबर २०१९ मध्ये ठेकेदार संस्थेमार्फत काम सुरू झाले. याच काळात स्वच्छता सर्वेक्षणाचे काम चालू होते. जिल्हाधिकारी तथा आयुक्त यांच्या आदेशानुसार शहरातील गाडगीळ पटांगण, सिना नदी काठ, शहरातील मोकळ्या जागा तसेच विविध ठिकाणी साचलेला कचरा डिसेंबर २०१९, जानेवारी २०२० व फेब्रुवारी २०२० या काळामध्ये उचलण्यात आला. त्यामुळे १८० ते १९५ टन कचरा उचलण्यात आला आहे. वजन मापे विभागामार्फत प्रमाणित केलेल्या वजनकाट्यावर ही वजने घेण्यात आलेली आहेत. तो कचरा लॉकडाउन काळातील नसल्याचे मनपाने म्हटले आहे.

तक्रारीमध्ये दुचाकीद्वारे कचरा वाहतुकीचा आरोप आहे. जे नंबर दिलेत त्यात ‘एएम’ ऐवजी ‘एएन’ असे नजरचुकीने लिहिताना चूक झालेली आहे. हे वाहन ट्रॅक्टर आहे. ठेकेदार संस्थेने तो भाडेतत्वावर घेतलेला आहे व त्याचे आरसी बुक मनपाकडे आहे. ज्या वाहनाची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंद नाही, असे म्हटले आहे, त्या वाहनाच क्रमांक ‘बीवाय’ ऐवजी ‘बीव्ही’ असा लिहिला गेला आहे. त्यामुळे त्याची नोंद मिळाली नसल्याचेही, महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, तपासादरम्यान सर्व माहिती व कागदपत्रे सादर केली जातील. कोणताही तपास व चौकशीला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. आमच्याकडून कोणतीही फसवणूक झालेली नाही.

उलट सर्वेक्षण काळात अतिरिक्त कचरा संकलन केल्याची बिले अद्यापही आम्हाला मिळालेली नाहीत, असे स्वयंभु ट्रान्सपोर्टकडून सांगण्यात आले आहे.दरम्यान, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीष जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार स्वयंभू ट्रान्सपोर्ट विभागात गुन्हा दाखल झाला आहे. यात महापालिका आरोपी नसली तरी यामुळे महापालिकेची बदनामी होत असल्याने महापालिकेकडून वस्तुस्थिती मांडली असल्याचे उपायुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

कोणत्याही चौकशी व तपासाला सामोरे जाण्यास तयार : स्वयंभू

कोव्हिड काळातील वाढीव बिले नाहीत कोव्हिड काळातील लॉकडाउनमध्ये एप्रिल २०२० व मे २०२० मध्ये सरासरी १४० ते १५० टन कचरा प्रति दिन उचलला आहे. कुठलीही अतिरिक्त देयके अदा केलेली नाहीत. त्यामुळे महापालिकेची कोणत्याही प्रकारची आर्थिक फसवणूक झालेली नाही. महापालिका कोणत्याही चौकशीस तयार असून न्यायालयासमोर व तपासादरम्यान मनपाची बाजू मांडण्यात येईल, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे के. के. देशमुख यांनी म्हटले आहे.

न्यायालयात योग्य बाजू मांडली नाही कचरा संकलन व वाहतुकीच्या वाढीव बिलांबाबत जिल्हा न्यायालयामध्ये खाजगी तक्रार दाखल झाली होती. सदर प्रकरणात ठेकेदार किंवा त्यांचे प्रतिनिधी, तत्कालीन अधिकारी स्वतः किंवा त्यांचे सल्लागार सुनावणीस उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे जिल्हा न्यायालयामध्ये महानगरपालिकेची योग्य बाजू मांडली गेली नाही, असेही मनपाने स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...